प्रतिनिधी / बेळगाव
अखिल भारत वीरशैव महासभा जिल्हा विभाग बेळगाव आणि जगज्योती श्री बसवेश्वर जयंती उत्सव केंद्र समिती यांच्यावतीने जगज्योती बसवेश्वर जयंतीनिमित्त शनिवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 30 रोजी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होऊन कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती बसव जयंती उत्सव केंद्र समितीच्या अध्यक्षा ज्योती भावीकट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार दि. 30 रोजी कारंजीमठाचे प. पू. गुरुसिद्ध महास्वामी, पालकमंत्री गोविंद कार्जोळ, खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. त्यानंतर स्वागत कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 1 रोजी वचन गायन स्पर्धा होणार आहेत. याबरोबरच बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोमवार दि. 2 रोजी शांताई वृद्धाश्रमाला फळांचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी अखिल भारत वीरशैव महासभेच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, माजी नगरसेवक रमेश कळसण्णावर, कार्यदर्शी सुजित मुळगुंद, गुरुदेव पाटील उपस्थित होते.