लिंगायत धर्म-बसवतत्त्वांविरुद्ध आचरणाचा आरोप
बेळगाव/बागलकोट : कुडलसंगम येथील पंचमसाली पीठाचे जगद्गुरु श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजींची पीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रविवारी कुडलसंगम येथे झालेल्या समाजप्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ट्रस्टचे मुख्य सचिव नीलकंठ असुटी यांनी हे जाहीर केली आहे. स्वामीजींवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. सतत लिंगायत धर्मविरोधी कारवायांत ते गुंतलेले असतात. त्यांनी स्वत:साठी मालमत्ताही जमवली आहे. हाच आरोप ठेवून त्यांची पंचमसाली जगद्गुरु पीठावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे समाजाच्या प्रमुखांनी सांगितले. समाज एकसंध ठेवण्याची जबाबदारी असणारे स्वामीजी समाजात फूट पाडत आहेत, असा आरोपही नीलकंठ असुटी यांनी केला आहे. समाजाचे अध्यक्ष विजयानंद काशप्पन्नावर व श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू झाला होता. अलीकडे स्वामीजींचा कल भाजपकडे वाढला आहे, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. यासंबंधी अनेक वेळा त्यांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. रविवारी झालेल्या बैठकीत शेवटी त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली समाजाला 2ए आरक्षण मिळविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जनआंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय आपण मठाला जाणार नाही, अशी भूमिका स्वामीजींनी मांडली होती. मात्र, बसवतत्त्वाला फाटा दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. समाजाचे अध्यक्ष आमदार विजयानंद काशप्पन्नावर यांनीही स्वामीजींवर ते राजकारण करीत आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांना लिंगायत व बसवतत्त्वाचा विसर पडला आहे. त्यामुळेच समाजाच्या सर्व प्रमुखांच्या बैठकीत त्यांना बदलण्याचा निर्णय घेतल्याचे विजयानंद यांनी पत्रकारांना सांगितले. अलीकडे माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी स्वामीजींनी जनआंदोलन जाहीर केले होते. तेथूनच संघर्ष पेटला होता. आता स्वामीजींनाच बदलण्यापर्यंत या घडामोडी येऊन ठेपल्या असून समाजप्रमुखांच्या या निर्णयामुळे स्वामीजींनाही धक्का बसला आहे. सध्या ते बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आपण बसवतत्त्व विसरलो नाही, समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपला लढा सुरू आहे. महात्मा बसवेश्वरांना त्रास झाला, तसा त्रास आपल्यालाही होतो आहे.









