वृत्तसंस्था / दुबई
भारताचा मध्यफळीत खेळणारा फलंदाज श्रेयस अय्यरची आयसीसीच्या मार्च महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराच्या नामांकन शर्यतीमध्ये श्रेयस अय्यर तसेच न्यूझीलंडचे जेकॉब डफी आणि रचिन रविंद्र यांचा समावेश होता.
आयसीसीच्या झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रेयस अय्यरची कामगिरी दर्जेदार झाली. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे 243 धावा जमविल्या. अय्यरच्या कामगिरीमुळे भारताला चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकता आली. आयसीसीच्या फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा बहुमान भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलने पटकाविला होता. सलग दोन महिन्यामध्ये आयसीसीचा हा पुरस्कार भारतीय क्रिकेटपटूंनी पटकाविला आहे.
30 वर्षीय श्रेयस अय्यरने मार्चमध्ये झालेल्या तीन सामन्यांमध्ये 172 धावा जमविताना 77.47 स्ट्राईकरेट राखला होता. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंड बरोबरच्या अ गटातील सामन्यात श्रेयस अय्यरने 98 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 79 धावा झळकविल्याने भारताने हा सामना जिंकला होता. तसेच या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या बरोबरच्या उपांत्य सामन्यात श्रेयस अय्यरने 62 चेंडूत 45 धावा जमविल्या होत्या. अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध त्याने 62 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले होते. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत श्रेयस अय्यरची कामगिरी दर्जेदार झाल्याने त्याची मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी आयसीसीने निवड केली. या शर्यतीमध्ये श्रेयस अय्यरने न्यूझीलंडच्या डफी आणि रचिन रविंद्र यांना मागे टाकले









