वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) कर्णधार श्रेयस अय्यरने वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पहिल्या स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्स (एमआय) आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या सामन्यावेळी आपण बॉल बॉय म्हणून कसे वावरत होतो त्याची आठवण जागविली आहे. तो आपला स्पर्धेचा पहिला अनुभव होता आणि रॉयल चॅलेंजर्सतर्फे त्यावेळी खेळणारा न्यूझीलंडचा खेळाडू रॉस टेलरशी आपल्याला थोडाफार संवाद साधता आला होता, असे त्याने सांगितले आहे.
गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सला त्यांचे तिसरे आणि मागील 10 वर्षांतील पहिले विजेतेपद मिळवून देणारा आणि दिल्ली कॅपिटल्सलाही अंतिम फेरीत नेणारा अय्यर 25 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या गुजरात टायटन्सविऊद्धच्या सामन्याने आपल्या यावेळच्या स्पर्धेतील मोहिमेची सुऊवात करणार आहे. पंजाब किंग्जतर्फे खेळताना देखील तशाच देदिप्यमान कामगिरीची पुनरावृत्ती करून दाखविण्याची आशा त्याने बाळगलेली असेल.
’सुपरस्टार्स’ कार्यक्रमात ‘जिओ हॉटस्टार’शी बोलताना अय्यर म्हणाला, ‘मी माझ्या भागात रस्त्यावरील क्रिकेट खेळत मोठा झालो आणि त्यावेळी मी मुंबईच्या 14 वर्षांखालील संघातून् खेळत होतो. मुंबईच्या संघातील सर्व मुलांना बॉल बॉईज म्हणून नेमण्यात आले होते आणि ‘आयपीएल’ इतक्या जवळून पाहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मला आठवते की, मी लाजाळू असलो, तरी सुदैवाने माझा त्यामध्ये समावेश राहिला. माझे मित्र खेळाडूंशी संपर्क साधत असताना मी मागे राहिलो आहे असे मला वाटले आणि मीही प्रयत्न करण्याचे ठरविले. रॉस टेलर हा माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक होता. म्हणून मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो, ’सर, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे.’ तो स्वभावाने खूप गोड होता. त्याने माझे आभार मानले. तेव्हा आवडत्या क्रिकेटपटूचे बॅट किंवा हातमोजे मागणे सर्वसाधारण होते. माझीही तशी खूप इच्छा होती, पण मला मागायला लाज वाटायला लागली, असे अय्यरने त्या आठवणी जागविताना सांगितले आहे.









