वृत्तसंस्था / चंदीगड
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने श्रेयस अय्यरची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे होते.
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी झालेल्या क्रिकेटपटूंच्या लिलावामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. क्रिकेटपटूंचा हा लिलाव गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दुबईत झाला होता. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला रिकी पॉटिंग हे प्रमुख प्रशिक्षक आहेत. आता अय्यरला पॉटिंगचे मार्गदर्शन लाभणार आहे. 2024 च्या क्रिकेट हंगामात सय्यद मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धेत श्रेयस अय्यरची कामगिरी दर्जेदार झाली. अय्यरच्या कामगिरीच्या जोरावर मुंबई संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुस्ताकअली क्रिकेट स्पर्धा जिंकली. तसेच गेल्यावर्षी रणजी आणि इराणी करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघामध्ये श्रेयस अय्यरचा समावेश होता.









