कोहीनूर विजापूर संघाचा 39 धावांनी विजय
बेळगाव : हासन येथे टाईम्स स्पोर्ट्स अकादमी आयोजित टाईम्स चषक साखळी पद्धतीच्यामुलींच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत कोहीनूर क्रिकेट क्लब विजापूरने हासन फ्रेंडस् संघाचा 39 धावांनी पराभव करुन 2 गुण मिळविले. बेळगावची अष्टपैलु खेळाडू श्रेया पोटेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. कोहीनूर क्रिकेट क्लब विजापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकात 3 गडी बाद 149 धावा केल्या. त्यात सलामीच्या बेळगावच्या श्रेया पोटेने 7 चौकारांसह 61, देवनिशाने 5 चौकारांसह 34, अन्नपूर्णा भोसलेने 2 चौकारांसह 21 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना हासन फ्रेंडस् संघाने 15 षटकात 6 गडी बाद 110 धावाच केल्या. त्यात के. पुष्पीता गौडाने 1 षटकार 10 चौकारांसह 73 धावा केल्या. तिच्या व्यक्तीरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. या सामन्यात अष्टपैलु फलंदाजी करणाऱ्या श्रेया पोटेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यापूर्वीही श्रेया पोटेने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामन्यांमध्ये संघटनेला यश संपादन करुन दिले आहे.









