संस्थेला यावर्षी 6,22,08,018.51 इतका नफा
बेळगाव : टिळकवाडी येथील श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. 17 रोजी संस्थेच्या समादेवी गल्ली येथील शहर शाखेत खेळीमेळीत पार पडली. प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा दडकर, उपाध्यक्ष सुनीता हणमशेट, संचालक माधुरी काटकर, मित्रा गरगट्टी, अंजली दैवज्ञ, सल्लागार डॉ. किरण ठाकुर व अभिजीत दीक्षित यांचे स्वागत करण्यात आले. प्रतिभा दडकर यांनी 2024-25 सालचा अहवाल सादर करून संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. ताळेबंद पत्रकाचे वाचन रुपा रेवण्णावर व नलिनी कुलकर्णी यांनी केले. नफा-तोटा पत्रक प्रेरणा महागावकर यांनी सादर केले. संस्थेला यावर्षी 6,22,08,018.51 रु. इतका नफा झाला असून 15 टक्के डिव्हिडंड देण्याचे त्यांनी जाहीर केले.
2024-25 सालासाठी संचालक मंडळाने तयार केलेल्या नफा विभागणी पत्रकाचे वाचन स्वाती माने यांनी केले. 2025-26 सालासाठीचे अंदाजपत्रक अमृता पवार यांनी सादर केले. यावेळी बोलताना डॉ. किरण ठाकुर म्हणाले, संस्थेची प्रगती उत्तमरीत्या सुरू आहे. यापुढेही वेगवेगळ्या आर्थिक योजना आखून त्यांना सबल बनवून त्यांचा आर्थिक स्तर उच्च करावा. तसेच महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अभिजीत दीक्षितही संस्थेची स्थिती भक्कम असून, मायक्रो फायनान्ससारख्या योजना आखून तळागाळातील महिलांसाठी काम करावे, असे सांगितले. सूत्रसंचालन तन्वी वेलंगी यांनी केले. सुप्रिया भोगण यांनी आभार मानले.









