हिरवे हिरवेगार असे हरित तृणांच्या मखमालीचे गालिचे सर्वत्र पसरलेले असून ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर मान्सूनच्या काळात येणारा श्रावण महिना गोवा-कोकणातील मानवी समाजाला आनंदोल्हासात सण, व्रतांशी एकरूप करत असतो. गोवा-कोकणतील एकंदर उपजतच उत्सवप्रिय असणाऱया कष्टकऱयांना येथील पाक संस्कृतीतील विविधांगी शाकाहारी अन्नपदार्थांचा आस्वाद देणारा श्रावण महिना ही भक्तीरसाची पर्वणी असते. श्रावणाचा प्रारंभ नागपंचमीसारख्या सणाद्वारे होत असला तरी या महिन्यातील प्रत्येक दिवस नानाविध व्रतवैकल्यांशी जोडलेला आहे. या महिन्यात येणाऱया प्रत्येक दिवशी येथील मानवी मन हिंदू असो अथवा ख्रिस्ती सण-उत्सवांची पूर्वापार सांगड घालून आपले जगणे समृद्ध आणि सुखी करण्याचा प्रयत्न करते. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या गावोगावी असणारी श्रद्धास्थाने निसर्गातील हिरवाईला, विविधरंगी पुष्पवैभवाला, आकाशी असणाऱया इंद्रधनुला पाहून उत्सवांशी एकरूप होण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा मानवी मनही आनंद द्विगुणित करण्यात सहभागी होतात.
श्रावण महिन्यातील सण-उत्सवांची आपल्या निसर्गस्नेही पूर्वजांनी घातलेली साखळी, श्रावणी पौर्णिमेला चरमसीमेला पोहोचते. श्रावणी उपकर्म, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, पवत्याची पुनव अशा विविध नावांनी लोकप्रिय असलेल्या या दिवसाला विशेष महत्व लाभलेले आहे. जून महिन्यात मान्सूनच्या पावसाला प्रारंभ होतो आणि ज्येष्ठ, आषाढात नदीनाले, झरे, ओहोळ पाण्याने तुडुंब भरून वाहतात. जमिनीत पेरलेल्या धान्याला फुले, फळे येतात. आपल्या सभोवताली हिरव्या वैभवामुळे जो उत्साह वातावरणात पहायला मिळतो, त्यामागे निसर्ग देवतेची कृपादृष्टी असल्याची भावना भारतीय लोकमानसात दृढ असल्याने, त्यांनी श्रावण महिन्यात सण, उत्सवांची रेलचेल निर्माण केलेली आहे. श्रावणातील पौर्णिमेला आकाशात समस्त कलांनी विकसित झालेला चंद्र असो अथवा माकडांना लग्नासाठी भ्रांती निर्माण करणाऱया हळदीच्या उन्हाची निर्मिती करणारा सूर्य असो, या साऱयांत देवत्व पहाणाऱयांनी त्यामुळे श्रावणी पौर्णिमेला वेगवेगळय़ा सणांबरोबर विधी, परंपरांची सांगड घातलेली आहे आणि लोकमनाला निसर्गातील दिव्यत्वासमोर नतमस्तक होण्यास जणूकाही प्रवृत्त केलेले असते. लाटांचे रौद्र भीषण असे तांडव श्रावणात पूर्वी हळूहळू शांत होत जायचे आणि त्यामुळे श्रावण पौर्णिमेला वरूणदेवाची पूजा करण्याची परंपरा निर्माण झाली असावी. माडाला भारतीय समाजाने कल्पवृक्षाचे स्थान दिलेले आहे आणि त्यामुळे नारळाला पावित्र्याचे वलय त्याच्या स्वरूपावरून लाभलेले आहे. सागर जरी रत्नाकर म्हणून परिचित असला तरी त्याच्या उदरी पैदासी होणाऱया माशांद्वारे किनारपट्टीवरच्या लाखो जनतेला अन्नाची रसद उपलब्ध होत असते. गोव्यातील बऱयाच मोठय़ा लोकसमुदायासाठी भात आणि माशाची आमटी म्हणजे ‘शीतकडी’ जेवणातला महत्वाचा घटक आहे आणि त्यामुळे पौष्टिकतेचा स्रोत म्हणून मत्स्यसंपदेकडे पाहिले जाते. गोवा आणि किनारपट्टीवरच्या प्रांतात वास्तव्यास असलेल्या मच्छिमार समाजासाठी समुद्र म्हणजे उपजिविकेचे साधन ठरलेला आहे. पावसाळय़ात मासेमारी सागराला उधाण असल्याने बंद असते. त्याच काळात माशांचे प्रजनन आणि भरण-पोषण होत असते. श्रावणात समुद्र शांत होऊ लागतो. त्यामुळे मच्छिमार समाज नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राचे पूजन विधीयुक्त करून नारळ अर्पण करतो आणि होडय़ांद्वारे मासेमारीस शुभारंभ करतो. नारळ हे शुभदायक आणि सर्जनशीलतेचे प्रतीक असलेले फळ असल्याकारणाने श्रावणी पौर्णिमेला वरूणराजाला ते सागराद्वारे अर्पण केले जाते आणि मासेमारीच्या व्यवसायाला फलदायी होण्याची प्रार्थना कृतज्ञतापूर्वक केली जाते.
एकेकाळी पावसाळय़ातील मत्स्य प्रजातींच्या प्रजननाच्या मोसमात मासेमारी थांबवली जायची आणि त्यानंतर नारळी पौर्णिमेच्या शुभदिनी होडय़ा, गलबतांची साफसफाई आणि रंगरंगोटी करून मासेमारीच्या व्यवसायाला उत्साहाने प्रारंभ केला जातो. त्यामुळे गोवा-कोकणातील किनारपट्टीवरच्या मच्छिमार समाजासाठी नारळीपौर्णिमा ही उत्साहाची आणि ऊर्जेची पर्वणी ठरलेली आहे. श्रावणी पौर्णिमेपासून पूर्वी विद्याभ्यास करण्यास पोषक मानले जायचे आणि त्यासाठी या दिवशी गुरुंकडून ज्ञान संपादन करण्याच्या भावनेने शिष्य पवित्र धागा मनगटाला बांधून ज्ञानोपासनेला आरंभ करतो तो गुरुकुलात. ज्याचे शिक्षण पूर्ण झालेले ते विद्यार्थी गुरुविषयी कृतज्ञता प्रकट करतात. वैदिक धर्माचे पालन करणारे श्रावणी पौर्णिमेला धारण केलेले यज्ञोपवित बदलून नव्याचा स्वीकार करतात. हा दिवस पोवती पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. सुताची पोवती करून ती विष्णू आदी देवदेवतांना अर्पण करतात. ग्रामीण भागात जेथे देवराया होत्या तेथे मूर्ती भंजकांपासून देवदेवतांचे रक्षण व्हावे म्हणून पाषाणी मूर्ती डोंगरमाथ्यावरच्या अशा पवित्र वनात सुरक्षित ठेवल्या जायच्या. स्वातंत्र्यानंतर काही ठिकाणी मंदिरांची उभारणी करून, तेथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली परंतु काही गावात पाषाणी मूर्ती देवरायात ठेवलेल्या असून श्रावणी पौर्णिमेला गंध, पुष्पाबरोबर पवित्र जानवी मूर्तींना अर्पण केली जातात. वृक्षवेलींनी समृद्ध असलेल्या अशा देवराया जैविक संपदेबरोबर त्यामुळे पुरातत्वीय घटकांचा खजिना ठरल्या होत्या. श्रावणी पौर्णिमेला वाजतगाजत मिरवणूक अशा देवरायात जाऊन पाषाणी मूर्तीचे पूजन करतात.
श्रावणी पौर्णिमा बौद्धधर्मियांतही पवित्र मानलेली असून या दिवशी बौद्ध भिक्खू आपल्या अनुयायांना धर्माचे नियम व परंपरा यांचे ज्ञान सोप्या शब्दांत सांगून त्यांनी जीवनात सदैव सद्वर्तनी होण्याची आकांक्षा अभिव्यक्त करतात. भारतीय भाषांत संस्कृत ही गिर्वाणभारती म्हणजेच देवाची भाषा म्हणून पूर्वापार प्रचलित असून, भारतीय संस्कृती, ज्ञान, विज्ञान आणि साहित्य यांनी परिपूर्ण असलेल्या या भाषेचा अभ्यास व्हावा म्हणून 1969 पासून तत्कालिन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा करण्याची परंपरा रूढ केली होती. भारताच्या धार्मिक, आध्यात्मिक मूल्यांनी समृद्ध असलेल्या संस्कृत भाषेच्या अध्ययनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे, या दिवसाचे महत्व अधोरेखित झाले आहे.
श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. आज रक्षाबंधनाचा सण बंधु-भगिनींचे नाते अभिवृद्ध करण्याचा सण म्हणून पाहिला जातो. बहीण आपल्या भावाला पवित्र धाग्याने आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्याचे आवाहन करते. बहीण-भावाचे नाते अतूट राहण्यासाठी आणि समृद्ध करण्याचे कार्य रक्षाबंधन करत आलेले आहे. राखीचा धागा केवळ सुताचा दोरा नसून त्याला बहिणीच्या प्रेमाची आणि जिव्हाळय़ाची किनार लाभलेली असते. बहीण रेशमी धागा भावाच्या मनगटाला बांधून रक्षणाची हमी घेत असते. दैत्य वृत्रासुराचा पराभव करण्यासाठी देवांचा राजा इंद्र याच्या हातावर इंद्राणीने धागा बांधला आणि त्यामुळे युद्धात इंद्राचा विजय झाला. पत्नीने पतीच्या हातावर धागा बांधला आणि युद्धात यश संपादन केले तरी कालांतराने रक्षाबंधनातून भावा-बहिणीचे अनुबंध सुदृढ करण्याची परंपरा निगडीत झाली. श्रावणी उपकर्म पोवत्याची पुनव, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा आदी सणांशी निगडीत असलेली श्रावणी पौर्णिमा धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांनी परिपूर्ण ठरलेली आहे.
– राजेंद्र पां. केरकर









