बेळगाव : 17 ऑगस्टपासून निज श्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. श्रावण मासानिमित्त मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे मागणी थंडावलेली दिसत आहे. विशेषत: चिकन, मटण, अंडी, मासे आणि खेकड्यांची मागणी कमी झाली आहे. त्या तुलनेत उपवासाचे साहित्य व फळा-फुलांना मागणी वाढू लागली आहे. मागील पंधरा दिवसांपासून श्रावण मासानिमित्त पूजा, अर्चा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रम वाढले आहेत. शिवाय दर सोमवारी शिवालयामध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्याबरोबर श्रावण शुक्रवारी लक्ष्मीव्रत अंगीकारले जाते. त्यामुळे मांसाहाराची मागणी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. परिणामी मांसाहारी हॉटेल व्यावसायिकांवर परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: मटण दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली आहेत. तर काहींची दुकाने सुरू असली तरी उलाढाल कमी झाली आहे. श्रावणमास सुरू असल्याने विविध फळाफुलांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारपेठाही फुलू लागल्या आहेत. दर सोमवार आणि शुक्रवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. दुसरीकडे श्रावणानिमित्त उपवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय मांसाहारदेखील वर्ज्य केला आहे. त्यामुळे मांसाहाराची मागणी घटली आहे.
कमी मागणीमुळे व्यवसायावर परिणाम
श्रावण मासामुळे मटण आणि चिकनची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दुकान एक महिन्यासाठी बंद केले आहे. श्रावण मासात महिनाभर मागणी कमी असल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे. सर्रास लोक या महिन्यात मांसाहार वर्ज्य करतात.
– उदय घोडके (मटण शॉप असो. अध्यक्ष)









