काकतीतील सिद्धेश्वर मंदिर

अरुण टुमरी /काकती
अन्यायाचा अंधकार सारून भाविकांच्या जीवनात सत्याचा साक्षात्कार घडविणारे काकती येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. रंजल्या-गांजल्यांच्या जीवनात सुखाचा मार्ग दाखवितो. अत्याचाराचे रान माजविणाऱयाचे दमन करतो. दिशाभूल करणाऱया, आडमुठय़ाला सत्य परिस्थिती दाखवून त्यांच्या स्वार्थबुद्धीचे प्रायश्चित देतो. भक्तावर आलेली वाईट वेळ, संकटे स्वःसामर्थ्याने दूर सारतो. सिद्धेश्वराचा महिमा अगाध असून मानवतावादी नीतिमूल्यांचा आदर्श आहे. यामुळे भाविकांची देवाच्या दर्शनासाठी मांदियाळी असते.
गुरु-शिष्याची भेट
बालपणीच श्री सिद्धेश्वराला श्री मल्लिकार्जुनच्या भक्तीचा ध्यास लागलेला असतो. श्रीक्षेत्र मल्लिकार्जुनची भेट घेऊन काकती येथील देवराईतील मोठय़ा शिळेवर श्री सिद्धेश्वर ध्यानधारणेत तल्लीन असतो. शिष्याच्या आंतरमनाची हाक ऐकून गुरु महातपस्वी श्री रेवणसिद्धेश्वर भेट घेण्यासाठी येतो. श्री सिद्धेश्वराला हाक देतो, वत्सा सिद्धेश्वरा..! तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी देतो, पण माझ्या उत्तरावर प्रश्न विचारणारा तू ज्ञानी आहेस. तुझ्या ज्ञानसाधनेचा उपयोग अन्यायाचा अंधकार दूर सारण्यासाठी भक्तांचा पाठीराखा हो! मानवी जीवन सुखी, समृद्ध करण्यासाठी युगानुयुगे आशीर्वाद देत रहा, असे म्हणून मार्गस्थ झाला. गुरु-शिष्यातील ज्ञानाचा अहंकार बाजूला सारणारी ती भेट होती. या ठिकाणी श्री सिद्धेश्वराचे पवित्र देवस्थान आहे.
मंदिराची स्थापना, देशकती संस्थान
काकती देशकती संस्थानचे तेरावे वारसदार धुळप्पगौडा देसाई म्हणजे राणी चन्नम्माचे पिताश्री होत. त्यांच्या घराण्याचे पूर्वज (खापर पणजोबा) मरियम गौडा हे विजापूरच्या अदिलशहाच्या दरबारी होते. अदिलशहाला आणि सरदार पटवर्धन (सरदेसाई) यांना त्रासदायक क्रूर दरोडेखोराला मरियम गौडाने शौर्याने जेरबंद करून अदिलशहाच्या हवाली केले होते. या खुशीत अदिलशहाने काकती देसाई देशकती संस्थान इनाम दिले. मरियम गौडा काकतीला येऊन स्थायिक झाले. काकती परिसरातील समृद्ध 29 गावे काकती देशकतीत समाविष्ट झाली. या ठिकाणी श्री सिद्धेश्वराचे उत्कृष्ट मंदिर बांधले. धुळप्पगौडा देसाईंनी श्री सिद्धेश्वराच्या मानवतेच्या नीतिधर्माचा पुरस्कार केला. काकतीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले.
श्री सिद्धेश्वराचा यात्रोत्सव
श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. गुढीपाडव्यादिवशी पाळणा बांधून यात्रोत्सवाचा शुभारंभ होतो. पावसाच्या नऊ नक्षत्रांचे महत्त्व अधिक असल्याने पहिल्या दिवशी पंचांगाचे वाचन करण्यात येते. पावसाबद्दल अंदाज आधीच बांधता येतो. सण-वार उत्सवांची माहिती मिळते.
इंगळय़ांची लाकडे आणणे, यात्राकाळात सायंकाळी आंबिल गाडय़ांच्या मानाला महत्त्व असून प्रथम सांगली संस्थानचा गाडा, दुसरा देशकती देसाईंचा गाडा, तिसरा कुलकर्णींचा मानाचा गाडा या वतनदारांच्या गाडय़ांना मानाची परंपरा आहे. रात्री शोभागाडे, इंगळय़ा प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम असतो. दुसरे दिवशी भर यात्रा, इंगळय़ांचा कार्यक्रम होतो. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. भाविक दीड नमस्कार व तुलाभार देवाला अर्पण करतात. पाच दिवस चाललेल्या यात्रेची सांगता होते. दसरा ऐतिहासिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. सीमोल्लंघन व बंदुकीने नारळ फोडणे, दिपावलीत तरंग यात्रा, श्री सिद्धेश्वराचा विवाह सोहळा, श्रावणमासात दर सोमवारी रुद्राभिषेक, तिसऱया सोमवारी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. वर्षातील दर सोमवारी सायंकाळी सात वाजता पालखी सोहळा मंगलमय वातावरणात पार पडत असतो.
जीर्णोद्धार-मंडळाचे उल्लेखनीय कार्य
कै. ठकाप्पण्णा कागणेकर, कै. शटुप्पण्णा देसाई यांच्या नेतृत्वाखाली पंच मंडळाने मंदिराच्या जीर्णोद्धाराला 1977 साली सुरुवात केली. तीन वर्षांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण होऊन लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मंगल कार्यालय बांधण्यात आले. पंच मंडळाने भांडण-तंटे मिटवून तंटामुक्त गावचा आदर्श श्री सिद्धेश्वराच्या साक्षीने केला. रामा कडोलकर, कै. शंकर मुंगारी, कै. आनंद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली पंच मंडळाने सेवा केली. कै. मनोहर मुंगारी यांनी सांस्कृतिक, धार्मिक मूल्य जोपासण्यासाठी झोकून कार्य केले. विद्यमान अध्यक्ष सिद्धाप्पा टुमरी (गाडेकर), उपाध्यक्ष शिवाजी नरेगवी यांच्या नेतृत्वाखाली पंच मंडळ सेवा करीत आहे.
हलशीतील रामेश्वर मंदिर

विवेक गिरी /खानापूर
तालुक्मयातील हलशी या कदंबकालीन राजधानीच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर विशालकाय कातळावर रामेश्वर मंदिर स्थापत्यशास्त्राची साक्ष देत गेली बाराशे वर्षे उभे आहे. अकराव्या शतकात कदंबाची राजधानी गोवा व हलशी या ठिकाणी स्थापन केली होती. जयकेशीच्या कार्यकाळात कदंब घराण्याचा सुवर्णकाळ होता. त्यावेळी हलशी, गोवा तसेच शिरशी बनवासी प्रदेशातील 1200 गावांवर कदंब घराणे राज्य करीत होते. हलशीत कदंबांनी विविध मंदिरे व जैन बस्त्या उभारल्या. त्यातील नृसिंह-वराह मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हत्तीकेश्वर, कलमेश्वर, सुवर्णेश्वर, लक्ष्मी-नारायण, जमकेश्वर, गोकर्णेश्वर, कपिलेश्वर, विनायक ही मंदिरे आहेत. या ठिकाणी कदंबांनी निर्माण केलेल्या सोमतीर्थ, वराहतीर्थ, चक्रतीर्थ, गवालतीर्थ, रामतीर्थ या तीर्थांचाही इतिहास पुरातन आहे. आज हलशीचे अस्तित्व एक छोटे गाव म्हणून आहे. या ठिकाणी पर्यटक इतिहास संशोधनासाठी येतात. परिसरात असणाऱया अनेक शिलालेखात पाचव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंतच्या नोंदी आढळतात.
महाकाय कातळावर मंदिर
हलशीच्या पश्चिमेला असलेले रामेश्वर मंदिर रामतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. महाकाय कातळावर मंदिर बांधकामासाठी दगड काढण्यात आला. दगड काढल्यानंतर या ठिकाणी मोठा कुंड तयार झाला. त्यालाच रामतीर्थ म्हणून संबोधले जाते. रामतीर्थाच्या काठावर रामेश्वर मंदिर उभारले गेले. या भव्य कुंडात बाराही महिने पाणी राहते. या ठिकाणी विष्णू मंदिरही उभारण्यात आले आहे. हरिहरचा भेद नष्ट करण्यासाठी आणि हरिहरचा भक्तीचा मळा फुलविण्यासाठी विष्णू आणि रामेश्वरचे मंदिर बांधण्यात आले. या ठिकाणी पूर्वी यज्ञयाग होत असत, याच्या इतिहासात नोंदी आहेत. 1870 साली शेवटच्या सोमयाग यज्ञावेळी हजारो भाविक दहा दिवस उपस्थित असल्याच्या नोंदी आहेत.
नवरात्रीनंतरच्या पौर्णिमेला नृसिंह मंदिरातून पालखी रामतीर्थ मंदिरावर भेटीसाठी येते. पालखी भेटीच्या उत्साहानंतर पुन्हा ती हलशीत येऊन नगर प्रदक्षिणा करते. ही परंपरा आजही सुरू आहे. या ठिकाणी पारंपरिक पुजारी आहेत. ते रामेश्वराची पूजा करतात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदिर व निसर्गरम्य परिसराची ख्याती पसरल्याने गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
निसर्गाच्या सानिध्यात मंदिर
हलशीपासून तीन किलोमीटर अवघड डोंगराची वाट असूनही पर्यटक रामेश्वर दर्शनासाठी वर्षभर येत असतात. अवघड डोंगर चढूनही निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर थकवा काही क्षणात दूर होतो. आल्हाददायक वातावरणात मन प्रसन्न होते. मोरांचा केकारव, पक्ष्यांचे मधूर आवाज, वाऱयाची झुळूक, निळे आकाश आणि समोर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा याचे विलोभनीय दृश्य मन मोहून टाकते. या रामेश्वर मंदिराच्या आत शिवलिंग तर बाहेर नंदी आहे. मंदिराच्या बाजूलाच विष्णू मंदिर आहे. विष्णूची काळय़ा पाषाणातील मूर्ती सुस्थितीत आहे. विष्णू मंदिराच्या मागे वीस फुटांवर ईश्वरलिंग स्थापित आहे. मात्र, हे मंदिर उद्ध्वस्त स्थितीत आहे. हे ईश्वरलिंग अनेक शतके ऊन-पावसाचा मारा झेलत उघडय़ावर आहे. रामेश्वर मंदिराजवळच माचीगड नावाचा छोटा ऐतिहासिक किल्ला असून गोव्याला जाताना शिवाजी महाराज या किल्ल्याला भेट देऊन गेल्याच्या नोंदी आहेत. आपणही एकदा रामतीर्थावरील आल्हाददायक निसर्गाचा अनुभव घ्यावा.









