आज पहिला श्रावण सोमवार! अर्थातच शहरातील शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंदिरांचे शहर अशीही बेळगाव शहराची ओळख आहे. येथील कपिलेश्वर मंदिराला तर दक्षिण काशी असा मान लाभला आहे. शहराबरोबरच तालुक्मयातही अनेक शिवमंदिरे आहेत. श्रावण सोमवारनिमित्त याच मंदिरांचा इतिहास आणि वैशिष्टय़े यांचा ‘दै. तरुण भारत’च्या वाचकांसाठी घेतलेला आढावा.
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर

हेमाडपंथी मंदिराला आध्यात्मिक, धार्मिक महत्त्व
दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कपिलेश्वर मंदिर प्राचीन काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. हेमाडपंथी मंदिराला आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व असून, एक सात्विक ऊर्जा या ठिकाणी आहे. त्यामुळेच दररोज हजारो शिवभक्त कपिलनाथांसमोर नतमस्तक होतात.
कपिलेश्वर मंदिराला 2 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. कपिल मुनींनी हे लिंग स्थापन केले असून, त्यामुळे या शिवलिंगाला कपिलेश्वर असे नाव पडले. कपिल ऋषींनी त्यावेळी प्रज्वलित केलेला धुनी आजही येथे तेवत आहे. बेळगावच्या किल्ला येथील 11 व्या शतकात बांधण्यात आलेल्या कमलबस्ती येथील शिलालेखात कपिलेश्वर देवस्थानचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या मंदिराला प्राचिन इतिहास आहे. मंदिरात केवळ शिवलिंगच नसून गणपती, श्रीकृष्ण, काळभैरव, वीरभदेश्वर, दत्तात्रेय, नवग्रह, राहु-केतु, नागदेवता, साईबाबा, मारुती व विष्णूचेही मंदिर आहे. मुंबई येथून आलेल्या एका पथकाने मंदिरातील सकारात्मक ऊर्जा पाहिली, तेव्हा कैलास पर्वताइतकी सकारात्मक ऊर्जा दिसून आली. दररोज हजारो भाविक कपिलेश्वर देवस्थानला भेट देतात. श्रावण सोमवार व महाशिवरात्रीच्या काळात तर हा आकडा लाखावर जाऊन पोहोचतो.
बेल-फुलांपासून खतनिर्मिती
भाविक ज्या श्रद्धेने कपिलनाथांवर बेल व फुले वाहतात, त्याचा योग्य विनियोग व्हावा या दृष्टीने कपिलेश्वर महादेव ट्रस्टने नवा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. बेल व फुले यांचा वापर करून खत निर्मिती प्रकल्प पुढील काही दिवसात उभारला जाणार आहे. त्याचबरोबर भक्तांसाठी उभारण्यात आलेल्या भक्त निवासाचेही लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.
विश्वस्त मंडळाचे उत्तम कार्य
मागील 4 ते 5 वर्षात कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने भाविकांचा विश्वास संपादन करत उत्तम कार्य सुरू केले आहे. विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात अनेक नवीन बदल घडविले आहेत. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी सुनील बाळेकुंद्री, उपाध्यक्षपदी सतीश निलजकर, सेपेटरी राकेश कलघटगी, सहसचिव राजू भातकांडे, खजिनदार दौलत साळुंखे, ट्रस्टी अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, अजित जाधव, ऍड. अभय लगाडे, अविनाश खन्नूकर, विवेक पाटील, अनिल मुतगेकर, प्रसाद बाचुळकर यांची समर्थ साथ मिळत आहे.
महनीय व्यक्तींची भेट
कपिलेश्वर मंदिराची ख्याती मोठी असल्यामुळे देशभरातील महनीय व्यक्ती कपिलनाथांच्या दर्शनासाठी आल्या आहेत. आठव्या शतकात शंकराचार्य, 18 ते 29 ऑक्टोबर 1892 या काळात स्वामी विवेकानंद, 1895 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, 1924 मध्ये महात्मा गांधीजी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आजतागायत मंदिराला भेट दिली आहे.
भारतातील दुसरी काशी!

सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी कपिल मुनींनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला कालांतराने कपिलेश्वर असे नाव पडले. हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाची समजली जाणारी चारधाम यात्रा कपिलेश्वराच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. एक काशी उत्तरेला आहे तर दुसरी काशी कपिलेश्वरांमुळे बेळगावमध्ये आहे. या मंदिरात असणारी सकारात्मक ऊर्जा तज्ञांनीही मान्य केली आहे.
– राकेश कलघटगी (सेपेटरी, कपिलेश्वर महादेव ट्रस्ट)
जागृत शिवालय

कपिलेश्वर मंदिर हे बेळगाव परिसरातील जागृत शिवालय आहे. महाशिवरात्रीसह श्रावण सोमवारांमध्ये मंदिरात मोठी गर्दी होते. यावषी विनायक पालकर हे 12 ज्योतिर्लिंग या परिसरात साकारणार आहेत. प्रत्येक भाविकाला दर्शन मिळेल अशा पद्धतीने त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
– अभिजीत चक्हाण (ट्रस्टी, कपिलेश्वर महादेव ट्रस्ट)
कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिर

मोहन कुट्रे /कडोली
सुमारे 1200 वर्षांची परंपरा लाभलेले जागृत देवस्थान आणि कडोली गावचे ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिर आहे. येथील श्री कलमेश्वर मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली आहे. सन 1050 साली एक गोमाता श्री क्षेत्र वैजनाथ मंदिर येथून निघून कडोलीत पूर्वी असलेल्या (आता मंदिराचे ठिकाण) तलावात दुधाच्या धारा सोडत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. तेथे शोध घेतल्यानंतर स्वयंभू शंकराची पिंडी व तीन बसवाण्णा मूर्ती आढळून आल्या. मोठय़ा भक्तिभावाने या ठिकाणी श्री कलमेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली, असे सांगण्यात येते.

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
या मंदिरात वर्षभर दर सोमवारी अभिषेक, पालखी सोहळय़ांचे आयोजन होत असते. येथे बांधल्या जाणाऱया बुत्ती पूजेला वैशिष्टय़ आणि महत्त्व आहे. नवस पूर्ण होण्यासाठी किंवा फेडण्यासाठी भाविक मोठय़ा श्रद्धेने अभिषेक व बुत्ती पूजेचे आयोजन करतात. रोज मंदिरात पूजा-अर्चा कार्यक्रम सुरू असतात. प्रत्येक सोमवारी वाजत-गाजत पालखी सोहळा पार पडतो. श्रावण महिन्यात बुत्ती पूजा, अभिषेक होत असतात. शेवटच्या श्रावण सोमवारी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भाविक मोठय़ा श्रद्धेने येथे आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात.
विजयादशमीला यात्रोत्सव
या देवाच्या यात्रोत्सवाला खऱया अर्थाने नवरात्रोत्सवापासून सुरुवात होते. पहिल्या पूजेपासून रोज नऊ दिवस विविध रुपात पूजा बांधली जाते. रात्रंदिवस धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामदैवताचा वार्षिक यात्रोत्सव असल्याने गावात स्वच्छता मोहीम, गल्लोगल्ली भगव्या पताका, विद्युत रोषणाईसह उत्साहाचे वातावरण असते. अष्टमी, नवमी आणि विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर गावात गोडधोड पक्वान्न असते. खंडेनवमीदिवशी बांधली जाणारी बन्नी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. उत्तर कर्नाटकात अशा प्रकारची बन्नी कोठेही बांधली जात नाही, हे या गावचे वैशिष्टय़ आहे. विजयादशमी काळात डी. जे., झांज, बेंजो आदी वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते.
देवालयाच्या पालख्यांचा मान
या देवालयाच्या पालख्यांना फार महत्त्व असून सोने लुटण्यासाठी किंवा प्रभूदेवाच्या डोंगरावर पालखीला आपलाही हातभार लागून आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी प्रत्येक तरुण धडपडत असतो. दवणा उत्सवात कडोलीच्या पालख्यांना मुख्य स्थान प्राप्त आहे. श्रीक्षेत्र वैजनाथांच्या उत्सवात या पालख्या गेल्याशिवाय शिव-पार्वतीचे लग्न होऊन दवणा चढत नाही. श्रीक्षेत्र वैजनाथला तरुण पालख्या कडोलीहून पळवत नेतात.
दैवी सर्पाचे वास्तव्य
या देवालयाचा रक्षणकर्ता म्हणून सापाचे वास्तव्य पूर्व काळापासूनच असल्याची श्रद्धा आहे. अनेकांना याचे दर्शन झाले आहे. कोणी नसताना मंदिरात जाण्यासाठी भाविक कचरत असतो. गाभाऱयात पुजाऱयांशिवाय कोणालाही प्रवेश नाही. वैशिष्टय़ असे की, मंदिरातील पिंडीवर विजयादशमी आणि गुढीपाडव्याला सूर्याची किरणे प्रवेश करतात. या देवालयाच्या प्रत्येक कार्यक्रमावेळी गावात कटबंद वार पूर्वीपासून पाळले जातात.

श्री कलमेश्वर देवालयाला पंचक्रोशीतील भक्तमंडळी येतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नारळ-खण ठेवतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अभिषेक, बुत्ती पूजेचे आयोजन करतात. माझ्या माहितीप्रमाणे येथे अनेकांचे नवस पूर्ण झाले आहेत.
– चिदंबर चन्नाप्पा पट्टणशेट्टी, पुजारी

सन 1050 साली श्री कलमेश्वर देवालयाची स्थापना झाली. मंदिराच्या ठिकाणी पूर्वी एक तलाव होता. या तलावात एक गाय दुधाच्या धारा सोडत होती. हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी तलावात खोदाई केली. त्यातून स्वयंभू शंकराची आणि तीन बसवण्णाच्या मूर्ती सापडल्या, असे ऐकिवात आहे.
– शंकर निंगाप्पा पाटील, भक्त

श्री कलमेश्वर मंदिर गावचे दैवत आहे. या ठिकाणी वर्षभर विशेषकरून श्रावण महिना आणि नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा, महाप्रसादाचे आयोजन होते. गावचे नागरिक देवालयात पूजा-अर्चा केल्याशिवाय कोणत्याही कामाचा कार्यारंभ करत नाहीत. या गावावर अद्याप कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवलेली नाही, हा या देवालयाचा आशीर्वाद आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
– अरुण फडके, हनुमान मंदिराचे पुजारी









