दुहेरी सुयोगावर श्रावणमासाला प्रारंभ : शहरातील सर्व मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : पहिला श्रावण सोमवार आणि नागचवथी असा दुहेरी सुयोग आल्याने शहर परिसरात या दोन्हींचे श्रद्धेने आचरण करण्यात आले. श्रावणमासाला प्रारंभ झाला असून शहरातील सर्व मंदिरांमध्ये श्रावणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिनाभर सर्वच मंदिरांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमांना भाविकही आवर्जून उपस्थिती दर्शवतात. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शहरातील सर्व शिवमंदिरे भाविकांनी फुलून गेली. येथील कपिलेश्वर मंदिराला दक्षिण काशीचाच मान मिळाला आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये तुलनेने गर्दी अधिक असते. रात्री 12 पासूनच विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. मंदिरातर्फे जनकल्याणार्थ रात्री अभिषेक करण्यात आला. सोमवारी पहाटे विशेष रुद्राभिषेक, त्रिकाल पूजन व सायंकाळी पालखी प्रदक्षिणा झाली.
मंदिरातील शिवपिंडीची पूजा करून पिंडीभोवती आंब्यांची सजावट करण्यात आली होती. दरवर्षी श्रावण सोमवारच्या निमित्ताने मंदिर समिती वेगवेगळे देखावे सादर करते. यंदा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जगन्नाथपुरीचा देखावा करण्यात आला आहे. बेळगावच्याच वसंत पाटील, विनायक पालकर, बसवराज होनगेकर, राजू लोहार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे मंदिर आकर्षकरीत्या सजविले आहे. श्रावण मासामध्ये श्रावण सरीसुद्धा कोसळत असल्याने भाविकांच्या सोयीसाठी कपिलेश्वर विसर्जन तलाव आणि मंदिर परिसरामध्ये वॉटरप्रुफ मंडप घालण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना दर्शन घेणे सोयीचे झाले. याच दिवशी नागचवथी असल्याने कपिलेश्वर मंदिरातील पुरातन अशा नागदेवतांचीसुद्धा भाविकांनी पूजा केली. त्याचप्रमाणे शहरातील बिस्कीट महादेव मंदिर, रामलिंगखिंड गल्लीतील रामलिंग मंदिर, महर्षी रोड व मंडोळी रोड येथील शिवमंदिर, कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर येथेसुद्धा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बेल, श्रीफळ, फुले व अन्य पूजा साहित्य विक्रीसाठी विक्रेत्यांनीही गर्दी केली होती. त्याचबरोबर खेळण्यांच्या विक्रीचेही स्टॉल उभारण्यात आले होते.
नागप्रतिमांचे पूजन
नागचवथीनिमित्त घरोघरी नागांच्या प्रतिमा आणून त्यांचे पूजन करण्यात आले. असंख्य घरांमध्ये अळूच्या पानावर नागप्रतिमा आणून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे बाजारपेठेत सोमवारी अळूच्या पानांची आवक वाढली होती. याशिवाय लाह्या आणि दूध अर्पण करून नागाला नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यामुळे लाह्या खरेदीसाठीही गर्दी झाली होती. काही समाजामध्ये चवथीला एक नागप्रतिमा व पंचमीला दुसरी नागप्रतिमा आणून तिची पूजा केली जाते. पाच प्रकारच्या पत्री, फुले यांनी नागाची पूजा करण्यात आली. या निमित्ताने घरोघरी फराळही तयार करण्यात आला.









