दक्षिणमूर्तींचा आईसोबत स्कुटरवरून 66 हजार किमी प्रवास
आईवडिलांना देवतेसमान मानले जाते. स्वतःच्या 73 वर्षीय आईची इच्छा पूर्ण कण्रयासाठी म्हैसूर येथील दक्षिणमूर्ती कृष्णकुमार हे 16 जानेवारी 2018 पासून स्वतःच्या स्कुटरवरून प्रवास करत आहेत. 44 वर्षी माजी कॉर्पोरेट मॅनेजर कृष्णकुमार हे स्वतःच्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र असून अद्याप त्यांनी विवाह केलेला नाही. मागील 5 वर्षांमध्ये स्वतःच्या आईसोबत त्यांनी सुमारे 66 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच देशभरातील जवळपास सर्वच प्रमुख धार्मिक स्थळांसोबत नेपाळ, भूतान अन् म्यानमारचा प्रवास केला आहे. कृष्ण कुमार हे स्वतःची आई चूडारत्नम्मा यांना स्कुटरवरून बसवून तीर्थयात्रा करत आहेत.

2018 पासून मी या ‘मातृ सेवा संकल्प यात्रे’वर आहे. माझी आईचे पूर्ण जीवन चार भिंती अन् एका छताखाली मर्यादित राहिले होते. याचमुळे मी तिला जग दाखवू इच्छित होतो. आता आम्ही वाराणसी येथे जात तेथे एखादा आश्रम, मंदिर किंवा मठात राहून काही धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी बिहारला जाणार आहोत. त्यानंतर नेपाळमधील पशूपतिनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचे कृष्णकुमार यांनी प्रयागराज येथे पोहोचल्यावर म्हटले आहे.
स्कुटरचीच निवड का?
वेगाने धावणाऱया रेल्वेंच्या जमान्यात या जुन्या स्कुटरची निवड का केली याचे उत्तर त्यांनी दिले आहे. ही स्कुटर माझ्या वडिलांनी मी 2001 मध्ये स्वतःचा डिप्लोमा पूर्ण केल्यावर दिली होती. 2015 मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले होते. यात्रेदरम्यान वडिलांची उपस्थिती जाणवत रहावी म्हणून स्कुटरवरून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारणपणे प्रतिदिन आम्ही 150 किलोमीटरचा प्रवास करतो, यादरम्यान कुठलीच वेळ निश्चित करत नाही. कारण मी हे माझ्या आईसाठी करत आहेत, तिच्या इच्छेनुसारच हा प्रवास करत असल्याचे दक्षिणमूर्ती यांनी सांगितले आहे.
आश्रम किंवा मठात वास्तव्य
हे दोघेही केवळ आश्रम किंवा मठातच राहतात. तसेच ते कुणाकडूनच पैशांची मदत घेत नाहीत. दिवसातून दोनवेळा शाकाहारी भोजन करत असतात. मधल्या वेळेत काहीच न खात असल्याने आमचे आरोग्य चांगले राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
लॉकडाउनदरम्यान भूतानमध्ये
पवित्र शहर अन् धार्मिकस्थळांचा रस्ते प्रवास नेहमीच आरामदायी नसतो. 2020 मध्ये कोरोनामुळे आम्ही लॉकडाउनदरम्यान 52 दिवसांसाठी भूतानच्या सीमेवर अडकून पडलो होतो. यापूर्वी म्हैसूर येथे पोहोचण्यासाठी एका आठवडय़ात आम्ही 2,673 किलोमीटरचा प्रवास केला होता असे दक्षिणमूर्ती यांनी सांगितले आहे.









