श्रद्धाचे शीर शोधण्यासाठी तलाव रिकामा करणार ः आज आफताबची नार्को टेस्ट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. छतरपूर जिह्यातील मेहरौली जंगलातून पोलिसांनी आतापर्यंत 17 हाडे जप्त केली असून ती तपासासाठी पाठवण्यात आली आहेत. तसेच चौकशीदरम्यान मुख्य संशयित आफताबने दिल्लीतील एका तलावात श्रद्धाचे डोके फेकल्याची माहिती तपास अधिकाऱयांना दिली. त्यानंतर दिल्ली पोलीस रविवारी संध्याकाळी छतरपूर जिह्यातील मैदान गढी येथे पोहोचून तेथील तलाव रिकामा करण्याच्यादृष्टीने नियोजन करत होते. श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी पाणबुडय़ांनाही पाचारण करण्यात आले आहे.
तपासादरम्यान रविवारा पोलिसांनी आफताबला घटनास्थळी आणले होते, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. मैदान गढी येथील तलावात आपण श्रद्धाचे डोके फेकल्याची कबुली त्याने दिली आहे. तसेच खुनाचे हत्यारही गायब आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जाणार आहे. दरम्यान, आफताबची सोमवारी नार्को टेस्टही होऊ शकते. यासाठी पोलिसांनी 40 प्रश्नांची यादी तयार केली आहे. तत्पूर्वी, श्रद्धाच्या हत्येचा सीन रिक्रिएट करण्यासाठी रविवारी सकाळी दिल्ली पोलीस आफताबच्या घरी पोहोचले होते.
पोलिसांना 18 ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त
यापूर्वी शनिवारी 18 ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज दिल्ली पोलिसांच्या हाती लागले होते. यामध्ये पहाटे चार वाजता आफताब बॅग घेऊन जाताना दिसला. तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे टाकण्यासाठी गेला होता, असा संशय पोलिसांना आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांनी मेहरौली फ्लॅटमधून सर्व कपडे जप्त केले आहेत. यामध्ये श्रद्धाच्या कपडय़ांचाही समावेश आहे.









