केटीआर यांनी प्रस्ताव दिल्याचा खासदाराचा दावा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) कार्यकारी अध्यक्ष केटे रामाराव (केटीआर) यांनी स्वत:ची बहिण के. कविता आणि इतरांच्या विरोधातील ईडी आणि सीबीआय चौकशी थांबविण्याच्या बदल्यात भाजपसोबत आघाडी किंवा पक्ष विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता, असा खळबळजनक दावा भाजप खासदार सी.एम. रमेश यांनी केला आहे. केटीआर हे दिल्लीत माझ्या निवासस्थानी आले होते, याचे सीसीटीव्ही फुटेजही मी दाखवू शकतो. चौकशी रोखल्यास बीआरएस भाजपमध्ये विलीन करू असे केटीआर यांनीच सांगितले होते असे रमेश यांनी नमूद केले आहे.
तर केटीआर यांनी संबंधित दावा खोटा आणि कपोकल्पित असल्याचे म्हटले आहे. बीआरएस कधीच कुठल्या पक्षात विलीन केला जाणार नाही. भाजप आणि काँग्रेसकडून या अफवा आमच्या विरोधातील खोट्या आरोपांवरून लक्ष हटविण्यासाठी पसरविल्या जात असल्याचा दावा केटीआर यांनी केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रे•ाr आणि भाजप खासदार सीएम रमेश यांच्यात गुप्त करार झाला आहे. तेलंगणात आंध्रप्रदेशच्या कंत्राटदारांना शासकीय कंत्राटं दिली जात आहेत. या कामांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांबद्दल रेवंत रे•ाr आणि रमेश यांनी जाहीर चर्चेस तयारी दाखवावी असे आव्हान केटीआर यांनी दिले आहे.
टेंडर वादावर स्पष्टीकरण
एल अँड टी, एमईआयएल आणि ऋत्विक यासारख्या मोठ्या कंपन्यांनी ग्रीनफील्ड रोडकरता निविदा भरली होती. नियमानुसार कंत्राट ऋत्विक कंपनीला देण्यात आले. ऋत्विक कंपनी माझ्या मुलाची असली तरीही तो यात संचालक नाही असे स्पष्टीकरण रमेश यांनी दिले. भाजप आणि तेदेप यांच्यात तेलंगणाकरता आघाडी झाल्यास बीआरएस पूर्णपणे संपू शकते अशी भीती केटीआर यांना सतावतेय आणि या भीतीपोटी ते खोटे आरोप करत असल्याचा दावा रमेश यांनी केला आहे.









