मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : ‘त्या’ वक्तव्याचा निषेध
बेळगाव : माजी आमदार संजय पाटील यांनी आपल्याबाबत केलेले वक्तव्य हा सर्व महिलांचा अपमान आहे. गॅरंटी योजनांमुळे महिला वाट चुकत आहेत, अशा प्रकारे महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपला नारीशक्तीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन त्या बोलत होत्या. भाजप एकीकडे महिला सबलीकरणाचा नारा देत आहे तर दुसरीकडे महिलांचा अपमान करीत आहे. यातून त्यांची कृती दिसून येते. संजय पाटील यांनी असे वक्तव्य अनेक वेळा केले आहे. यावेळी व्यासपीठावर खासदार मंगल अंगडी, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर उपस्थित असतानाही त्यांना आवरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. भाजप महिला सबलीकरण विरोधात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन महिलांचा अपमान केला जात आहे. महिलांच्या आत्मगौरवाला धक्का पोहोचविण्यात आला आहे. माजी मंत्री कुमारस्वामी यांनी गॅरंटी योजनांमुळे ग्रामीण भागातील महिला वाट चुकत असल्याचे वक्तव्य करून महिलांचा अपमान केला आहे. महिला कुठे वाट चुकत आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावे. गॅरंटी योजनांच्या यशामुळेच असे नको ते आरोप केले आहेत. खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणे हा भाजपचा अजेंडा आहे. काही झाले तरी या लोकसभा निवडणुकीत चिकोडी व बेळगाव मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी मंत्री मुरगेश निराणी यांच्या वक्तव्याचे निवडणुकीनंतर त्यांना उत्तर दिले जाईल, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.









