निपाणीत भाजपची जाहीर सभा : विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी शशिकला जोल्लेंना मताधिक्याने विजयी करा
वार्ताहर, प्रतिनिधी /निपाणी
निपाणी विधानसभा मतदारसंघाचे सलग दोनवेळा भाजपच्या माध्यमातून नेतृत्व करणाऱ्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी संपूर्ण मतदारसंघ आपले कुटुंब समजून विकास केला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात त्यांनी यश मिळविले आहे. अशा या शशिकला जोल्ले समर्थ नेतृत्व आहेत. म्हणूनच बिनकामी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधात उमेदवार देऊन संपूर्ण मतदारसंघाचा, महिलांचा अवमान केला आहे. विरोधकांना त्यांची जागा दाखवा व शशिकला जोल्ले यांना विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले. निपाणीत मंगळवारी विद्या संवर्धक मंडळाच्या मैदानावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला समावेश जाहीर सभेत त्या बोलत होत्या. प्रारंभी शहर महिला मोर्चा अध्यक्षा प्रा. विभावरी खांडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्या हस्ते मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला.
विरोधकांकडे आरोप करायला मुद्दाच नाही
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जगात सर्वोत्तम बनविले. दलित व आदिवासींसह सर्व जातीधर्मांना भाजपने सन्मान दिला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष संपले आहेत. कोरोना संसर्ग काळात भाजप सरकार होते म्हणूनच देश सुरक्षित राहिला. कोरोना प्रतिबंधक लस, गरिबांना धान्य भाजपा सरकारनेच दिले. आता विरोधकांकडे आरोप करायला मुद्दाच राहिलेला नाही. मंत्री शशिकला जोल्लेंना मताधिक्याने विजयी करण्यासाठी व कर्नाटकात पुन्हा भाजपा सरकार येण्यासाठी योगदान द्या, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.









