तालुका पंचायतीचा कारभार : अधिकारी गैरहजर, कामांचा खोळंबा, वरिष्ठांनी लक्ष देण्याची आवश्यकता
बेळगाव : तालुका पंचायतीचा कारभार या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो. सध्या कार्यालयाचा कारभार वाऱ्यावरचा झाला असून येथे एकाचा ताळमेळ एकाला नाही, अशी अवस्था झाली आहे. तालुक्यातील नागरिकांची कशी गैरसोय होईल, याकडेच अधिक लक्ष देण्यात येते का? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या या कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी गायब झाले असून त्यांच्यावर बक्षीसही ठेवण्यात यावे का? हे पहावे लागणार आहे. त्यामुळे काही प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडू लागला आहे. तालुका पंचायतमधील काही वरिष्ठ अधिकारी सध्या गायब झाले आहेत. त्यामुळे अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा, असेच म्हणावे लागेल. बेळगाव तालुक्यातील 57 ग्राम पंचायतमधील कोणतीही कामे असल्यास तालुका पंचायतकडे यावे लागते. त्यानंतरच त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो. मात्र सध्या अधिकारी गायब असल्यामुळे कामे कोणाकडून करायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुका पंचायतमध्ये मागील काही दिवसांपासून असे प्रकार दिसतात. त्यामुळे याचा फटका कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांना व पीडीओंनाही बसत आहे. संगणक उतारा दुरुस्ती असो किंवा इतर कामेही तालुका पंचायतमध्ये केली जातात. ही प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंगठा लागणे गरजेचे असते. मागील महिन्याभरापासून ही कामे रेंगाळली आहेत. याचबरोबर इतर कामेही रेंगाळली आहेत. तर संबंधित अधिकारी रात्रीच्यावेळी कार्यालयात हजर होत असल्याचे दिसते. तालुका पंचायतमध्ये मागील अनेक वर्षांपासून तळ ठोकणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र त्यांच्या बदलीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तर काही जण स्वत:च वरिष्ठ अधिकारी असल्याचा आव आणत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पीडीओंबरोबर काही प्रामाणिक कर्मचारीही येथून बदली करून घेण्यासाठी धडपडत आहेत. मात्र याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा डोलारा सावरण्यासाठी जिल्हा पंचायतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दररोज इकडे भेट दिली, तिकडे भेट दिली, अशी कारणे अधिकारी सांगत आहेत. मात्र नेमकी भेट कोठे दिली हे सांगत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. कामाऐवजी इतर सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यात येत असून नागरिकांची कामे कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
साहाय्यक सचिवही गायब
मागील काही दिवसांपासून साहाय्यक सचिवही गायब झाले आहेत. त्यामुळे उद्योग खात्रीची कामेही रेंगाळली आहेत. पावसाअभावी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग खात्रीवर अनेकांची भिस्त आहे. मात्र अधिकारी गायब झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही कामगार येत असले तरी त्यांना काम देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे.









