तालुका म. ए. समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना आवाहन : एकजुटीने रिंगरोडला विरोध करणे आवश्यक
प्रतिनिधी / बेळगाव
रिंगरोडविरोधात सोमवार दि. 28 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये तालुक्मयातील सर्वच शेतकऱ्यांनी आपला सहभाग दर्शवावा. शेतकऱ्यांनी येताना
टेम्पो, टॅक्टरवर आपल्या गावचा बॅनर लावावा, शेतकऱ्यांनी हातामध्ये चाबूक घेऊन यावे, तसेच केवळ शेती वाचविण्यासाठी घोषणा दिल्या जाव्यात, कोणताही ध्वज वाहनांवर लावू नये किंवा कोणीही आणू नये, असे आवाहन तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. याबाबत ठरावही करण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
मोर्चा काढण्याबाबत चर्चा करण्यासाठी गुऊवारी दुपारी ओरिएंटल स्कूलच्या संत तुकाराम महाराज सभागृहामध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. त्यामध्ये वरील आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी कोणत्याही परिस्थितीत शेतकरी रिंगरोडला जमीन देणार नाहीत, असे सांगत शेतकऱ्यांनी एकजुटीने विरोध केला पाहिजे. याचबरोबर सोमवारच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले.









