मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना काँग्रेसचे आव्हान
प्रतिनिधी/ पणजी
म्हादईच्या पाणी वादावरून भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस या दोघांनीही कर्नाटक आणि गोव्यातील जनतेच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेसचे गोवा प्रभारी मणिकम टागोर यांनी केला. गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगावात म्हादईसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याचे धाडस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
गोव्याचे प्रभारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी पणजीत आयोजित आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी टागोर गोवा भेटीवर आले होते. पुढे बोलताना त्यांनी, म्हादई पाणी वाटप वादाबाबत भाजपची भूमिका नेहमीच दोन्ही राज्यातील निवडणुकांशी संबंधित होती, असा दावा केला.
भाजप आणि आरएसएस यांना कधीच गोव्याबद्दल आस्था किंवा संवेदनशीलता नाही. त्यांच्यासाठी केवल निवडणुका जिंकणे एवढेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच ते कर्नाटक आणि गोव्यातील लोकांच्या भावनांशी राजकारण खेळत आहेत, असे टागोर म्हणाले. याउलट काँग्रेस पक्ष गोवा आणि गोमंतकीयांच्या कल्याणासाठी उभी आहे आणि लोकांच्या पाठीशी राहून त्यांच्या हक्कांसाठी लढणार आहोत, असे ते म्हणाले.
गृहमंत्र्यांनी नुकत्याच बेळगाव येथील सभेत म्हादईसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे गोव्यात खळबळ उडाली आहे. त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नसले तरी त्यांच्या दोन सहकारी मंत्र्यांनी मात्र शहा यांच्या वक्तव्यास उघडपणे विरोध दर्शविण्याचे धाडस केले आहे, असे टागोर म्हणाले.
शहा यांची वक्तव्ये ही केवळ कर्नाटकातील लोकांना खूश करण्यासाठीची असून अधिकाधिक खासदार निवडून यावे यासाठीचा खटाटोप आणि राजकीय खेळी आहे. मात्र लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास टागोर यांनी व्यक्त केला.









