वाहतूक खाते झाले कडक : वाहतुकीत शिस्तीचे प्रयत्न
पणजी : अतिवेगाने वाहने चालविणाऱ्या आणि लाल सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांना एआयच्या (आर्टिफिशल इंटेलीजन्स) माध्यमातून वाहतूक नियम उल्लंघनासाठी दंड ठोठावण्यात आला असून त्याबद्दलचे चलन घरी पाठविण्यात आले आहे. मात्र अनेक वाहनमालकांनी दंड भरलेला नसल्याने त्यांना वाहतूक खात्याकडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असे वाहतूक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर यांनी सांगितले. एआय कॅमेरे पणजी शहरातील रस्त्यांवर लक्ष ठेवून आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चलन जारी केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात शिस्त लागली आहे. जारी केलेले चलन किंवा दंड माफ केला जाणार नाही. त्यासाठी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दंड न भरलेल्या वाहनचालकांना खात्याने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
परवाना रद्द होऊ शकतो
वाहनमालकांनी पत्ता बदलल्यास किंवा फोन नंबर बदलल्यास वाहतूक खात्याकडे वेळीच कळविणे आवश्यक आहे. जेणेकरून चलन वाहनमालकांपर्यंत वेळीच पोहोचेल. वेळीच दंड भरणे आवश्यक असतो, न भरल्यास वाहन परवाना रद्द होऊ शकतो. पणजीतील एआय स्मार्ट सिग्नल यंत्रणेवर 1 जूनपासून हजारो वाहतूक नियम उल्लंघनांची नोंद झाली आहे.
जून ते ऑगस्टपर्यंत देण्यात आलेली चलने
- वेगमर्यादेच्या उल्लंघनासाठी 12,680
- लाल सिग्नल उल्लंघनासाठी 11,671
जून ते ऑगस्टपर्यंत दंड भरलेली चलने
- वेगमर्यादा उल्लंघन 8,334
- लाल सिग्नल उल्लंघन 8,253
जानेवारी ते मे पर्यंत रद्द झालेले परवाने
- अतिवेगासाठी 788
- सिग्नल उल्लंघनासाठी 424
मेघना सावर्डेकरने भरले नाही दंड
बाणस्तारी येथील भीषण अपघात गुंतेल्या मेघना सावर्डेकर हिने तिला जून व जुलै महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जारी केलेल्या चलनातील दंड भरलेला नसल्यामुळे तिचा वाहन परवाना रद्द होऊ शकतो. मेघना सावर्डेकर हिचा पती परेश सावर्डेकर याच्या उतावीळपणाने आणि निष्काळजीपणाने हा भीषण अपघात झाला होता. त्यात तीन लोकांचा मृत्यू झाला आणि अन्य एकाला अर्धांगवायू झाला.
पर्वरीतील अपघात अतिवेगामुळे
गेल्याच आठवड्यात 2 सप्टेंबरच्या मध्यरात्री आणखी एक भीषण अपघात पर्वरी येथे घडला. त्यात तिघांचा मृत्यू झाला तर दोन तरुणी जखमी झाल्या. हा अपघात वेगमर्यादेच्या उल्लंघनामुळे झाला असून अशा अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलन जारी केले जात आहे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. ज्या ठिकाणी अतिवेगाने वाहने चालविली जातात त्या ठिकाणीही अचानक तपासणी केली जाते, असे वाहतूक विभागाचे अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.









