मनपा आयुक्तांकडून कारवाई, शिक्षकांमधून संताप
बेळगाव : निवडणूक प्रशिक्षणावर बेळगाव शहरातील शिक्षकांनी बहिष्कार घातला होता. यामुळे महानगरपालिका आयुक्तांकडून सर्व बीएलओ शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. 24 तासांमध्ये उत्तरे न दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शाळा शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामांमध्ये गुंतवू नये, अशी मागणी शिक्षकांकडून केली जात होती. याचा परिणाम शाळांच्या शैक्षणिक दर्जावर होत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. निवडणुकीसाठी शहरासह परिसरातील शिक्षकांना बीएलओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या शिक्षकांना शुक्रवार दि. 28 जुलै रोजी बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने कुमार गंधर्व रंगमंदिर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु ही जबाबदारी मान्य नसल्याने सर्व शिक्षकांनी सामुहिकरित्या बहिष्कार घातला. शिक्षकांनी सामुहिकरित्या बहिष्कार घातल्याने संतापलेल्या आयुक्तांनी मंगळवारपासून शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. बीएलओ शिक्षकांना घरोघरी जाऊन निवडणुकीसाठी सर्व्हे करावा लागणार आहे. शिक्षकांनी बीएलओ प्रशिक्षणावर बहिष्कार का घातला? यासंदर्भात 24 तासांमध्ये लेखी उत्तरे द्यावीत, अन्यथा 1950 कायद्यांतर्गत शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
शिक्षकांमधून संतापाची लाट
उच्च न्यायालयाने शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असताना बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त मात्र प्रशिक्षणावर ठाम आहेत. सामूहिक बहिष्कार घातल्याने संतापलेल्या आयुक्तांनी शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. महापालिकेचे कर्मचारी वॉर्डनिहाय शिक्षकांकडे येत असून त्यांना नोटिसा देत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवायचे की, निवडणुकांसाठी घरोघरी जाऊन सर्व्हे करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नोटीसीला 270 शिक्षकांचा उत्तर देण्याचा निर्णय
शिक्षकांवर निवडणुकांसाठीच्या सर्व्हेची जबाबदारी टाकली जात आहे. परंतु शाळेच्या गुणवत्तेवर या सर्वांचा परिणाम होत असल्यामुळे शिक्षकांचा विरोध सुरू आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या असल्या तरी त्याला शहरातील 270 शिक्षकांनी उत्तर देण्याचे ठरविले आहे. बेंगळूरमध्येही सर्व शिक्षकांची यासंदर्भात चर्चा सुरू असून निवडणुकीच्या कामाला शिक्षकांचा विरोध आहे.
– जयकुमार हेब्बळ्ळी (अध्यक्ष, बेळगाव जिल्हा प्रा. शा. शिक्षक संघटना)









