महानगरपालिकेच्या अर्थ-स्थायी समिती बैठकीत निर्णय
बेळगाव : बैठकीला उपस्थित राहण्याबाबत आगाऊ नोटीस देऊनदेखील काही अधिकारी वारंवार गैरहजर राहत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाशी काही माहिती विचारायची असल्यास कोणाला विचारावी? असा प्रश्न पडतो. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय महापालिकेतील गुरुवारच्या अर्थ-स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला. स्थायी समिती बैठकीचे कौन्सिल विभागाकडून आयोजन केल्यानंतर समितीचे अध्यक्ष, सदस्य, त्याचबरोबर अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली जाते.
बैठकीची आगाऊ नोटीस मिळूनदेखील बहुतांश अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून अर्थ-स्थायी समितीच्या बैठकीला वारंवार गैरहजर राहत आहेत. गुरुवारी स्थायी समिती सभागृहात अध्यक्ष रेश्मा कामकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीला काही मोजकेच अधिकारी उपस्थित होते. ही बाब अध्यक्ष व सदस्यांनी गांभीर्याने घेतली. दर बैठकीला काही अधिकारी सातत्याने गैरहजर राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदस्य शंकर पाटील यांनी हा विषय उचलून धरला. अधिकारी उपस्थित राहत नसल्याने ही बाब गांभीर्याने घेत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली.
तसेच यावर कोणती कारवाई करता येऊ शकते? अशी विचारणाही त्यांनी महापालिकेच्या कायदा सल्लागारांकडे केली. त्यावेळी अधिकारी वारंवार बैठकीला गैरहजर राहत असल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावता येते, असे सांगण्यात आले. त्यामुळे गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व अधिकाऱ्यांना बैठकीची नोटीस देण्यात आली आहे का? अशी विचारणाही कौन्सिल सेक्रेटरींकडे करण्यात आली. त्यावेळी महापालिकेशी संबंधित सर्व 20 विभागांना बैठकीची नोटीस देण्यात आल्याचे कौन्सिल सेक्रेटरींनी स्पष्ट केले.









