निकालवाढीचे प्रयत्न फोल ठरल्याने खात्याची कार्यवाही : 40 टक्क्यांपेक्षा कमी निकाल
बेळगाव : दहावीचा निकाल वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून वर्षभर प्रयत्न करण्यात आले. परंतु, त्याचा उपयोग झाला नसल्याचे निकालातून दिसून आले. जिल्ह्यातील बऱ्याच शाळांचा निकाल 40 टक्क्यांपेक्षा कमी लागला आहे. त्यामुळे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या उपसंचालक कार्यालयाने बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 82 शाळांना कारणे दाखवा नोटीस पाठविली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. यावर्षी बेळगाव व चिकोडीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली. खासगीपेक्षा अनुदानित व सरकारी शाळांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
काही शिक्षक गांभीर्याने शिक्षण देत नसल्यामुळे असे प्रकार होत असल्याची तक्रार पालकवर्गाने केली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने आता थेट मुख्याध्यापकांनाच कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव शहर विभागात 17, बेळगाव ग्रामीण 20, बैलहोंगल 10, सौंदत्ती 10, रामदुर्ग 7, खानापूर 5, कित्तूर 2 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 11 शाळांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. 151 शाळांचा निकाल 50 टक्क्यांहून कमी लागला आहे. यावर्षी निकालात घसरण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 40 टक्क्यांहून कमी निकाल लागलेल्या 82 शाळांची यादी तयार करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. स्पष्टीकरण न देणाऱ्या शाळा तसेच मुख्याध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सरकारी व अनुदानित शाळांच्या तुलनेत खासगी शाळांचे निकाल वाढले आहेत. 27 खासगी शाळांचा निकाल हा 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण क्षेत्रासाठी चिंताजनक बाब
वर्षभर मेहनत घेऊनही काही शाळांचे निकाल 40 टक्क्यांहून कमी लागले आहेत. ही शिक्षण क्षेत्रासाठीची चिंताजनक बाब आहे. अशा शाळांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून सोमवारपासून ते द्वितीय परीक्षा देणार आहेत.
– लीलावती हिरेमठ (जिल्हा शिक्षणाधिकारी)









