एकप्रकारे निवडणूक काळातही दडपशाही सुरू
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिक जनता गेल्या 63 वर्षांपासून मराठी भाषा व अस्मितेसाठी लढा देत आहे. याच कारणासाठी आजपर्यंत निवडणूक लढवत आहे. निवडणूक लढविताना बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या जातात. मात्र यावर्षी अशा घोषणा दिल्या म्हणून निवडणूक आयोगाने चक्क दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर आणि उत्तर मतदारसंघाचे आमदार अॅड. अमर येळ्ळूरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. म. ए. समितीचे दक्षिण मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर आणि उत्तर मतदारसंघातील उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी 20 एप्रिल रोजी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सीमाप्रश्नासंदर्भात घोषणा दिल्या. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन, असे म्हणत ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकप्रकारे निवडणूक काळातही दडपशाही सुरू करण्यात आली असून यामुळे आता मराठी जनता एकजुटीने विरोध करण्याच्या तयारीला लागली आहे.









