कर भरण्यास गेल्यानंतर उद्या या अशी उत्तरे : नागरिकांतून नाराजी, वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का?
बेळगाव : महापालिकेला कर जमा झाला तरच शहराचा विकास करणे सोपे जाणार आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून बऱ्याचवेळा घरपट्टी तसेच इतर कर जमा करण्यासाठी मोहीम राबविली जाते. मात्र आता कर भरण्यासाठी गेलेल्यांना उद्या या, असे उत्तर महापालिकेतून दिले जात आहे. त्यामुळे महापालिकेला कर नको का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्याने केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. याचबरोबर शहरातून दरवर्षी कोटी रुपयांचा करही जमा होतो. मात्र तो कर वेळेत जमा झाला तर निश्चितच त्याचा फायदा महापालिकेबरोबर सरकारलाही होतो. दुकानांचा कर, घरपट्टी, पाणीपट्टी, ऑनलाईनद्वारे घेतली जात आहे. मात्र काही लहान दुकानदारांना तो कर भरणे जमत नसल्यामुळे थेट जाऊन महापालिकेमध्ये भरण्याचा प्रयत्न करत आहेत.
कर भरण्यासाठी गेले असता त्यासाठी चलन भरावे लागते. मात्र तेथील कर्मचारी ते चलन भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. वास्तविक कर आल्यानंतर तातडीने चलन भरून ती रक्कम जमा केली पाहिजेत. पण आज तुमची कागदपत्रे द्या, चलन भरून ठेवतो. चलन भरून झाल्यानंतर तुम्हाला फोन करतो. त्यावेळी येवून कर भरा, अशी उत्तरे दिली जात आहेत. यामुळे कर भरण्यासाठीही महापालिकेचा हेलपाट मारावा लागत आहे. महापालिकेमधील कोणत्याही प्रकारची कामे तातडीने होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. बऱ्याच वर्षांपासून या परिसरात एजंटराज सुरू आहे, असा आरोप देखील होत आहे. कर भरताना ही परिस्थिती असेल तर इतर कामांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









