सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले : वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रस्ते सुरक्षेशी निगडित एक याचिका फेटाळली आहे. राज्यांमध्ये मोटर व्हेईकल अॅक्टचे नियम योग्यप्रकारे लागू केले जात नसल्याचा दावा याचिकार्त्याने केला होता. हा प्रशासनाचा विषय असून आम्ही तो हाताळू शकत नसल्याचे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले आहे.
मोटर व्हेईकल सिस्टीम न्यायालयाने चालवावी अशी याचिकाकर्त्याची इच्छा आहे का? सर्वांच्या डोक्यावर मॉनिटर लावावेत अशी तुमची मागणी आहे का अशी संतप्त विचारणा सर्वोच्च न्यायालयाने याचिकार्त्याला उद्देशून केली.
सर्वोच्च न्यायालयाने स्वत: वाहतूक विभाग सुरू करून वाहतूक कशाप्रकारे सुरु आहे आणि कॅमेरे कशाप्रकारे लावण्यात आले हे पहावे अशी तुमची इच्छा आहे का? सर्व राज्यांना पाचारण करून येथे गर्दी जमा करावी का असे प्रश्नार्थक विधान सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी केले.
दुसरे काम आहे की नाही?
सर्वोच्च न्यायालयात याच महिन्यात प्रसिद्ध कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीवर दाखल याचिकेवर सुनावणी झाली. बस्सीच्या एाक शोमध्ये वकिलांसंबंधी टिप्पणी करण्यात आली होती. बस्सीने वकील अन् कायद्याची थट्टा केली असून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी करणारी याचिका अॅडव्होकेट फरहत वारसी यांनी केली होती. तुमच्याकडे दुसरे काम आहे की नाही? आम्ही एखाद्या स्टँडअप कॉमेडी शोबद्दल सुनावणी करावी का? काहीतरी चांगला विषय घेऊन इथे या. तुम्हाला पूर्ण समुदायाची चिंता करण्याची गरज नाही अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले होते.