शहर स्मार्ट करण्यासाठी प्रशासनाचा आटापिटा; मात्र नागरिकांचेही सहकार्य मिळणे तितकेच महत्त्वाचे : भूमीगत कचराकुंडींकडे दुर्लक्ष
बेळगाव : बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या बेळगावकऱ्यांना आता स्मार्ट सिटीच्या कामांचा वैताग आला आहे. स्मार्ट नको स्वच्छ शहर द्या, अशी मागणी बेळगावकर करत आहेत. दुसरीकडे महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी शहरातील कचरा उचल नीट व्हावी, यासाठी स्वत: जातीने लक्ष घालत आहेत. परंतु जोपर्यंत नागरिकांचे सहकार्य त्यांना मिळणार नाही तोपर्यंत सर्व प्रयत्न निरर्थक ठरण्याची शक्यता आहे.
बेळगाव शहरातील कचरा उचल हा एक कळीचा आणि गंभीर प्रश्न आहे. नागरिकांनी तक्रारी करायच्या, मनपाने त्याची दखल घ्यायची, कचरा उचल करायची आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झालेली पहायची, हा आता एक कलमी कार्यक्रम झाला आहे. सातत्याने सरकार आणि प्रशासनावर किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेणारे नागरिक जोपर्यंत आपली जबाबदारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, हे लक्षात घेत नाहीत तोपर्यंत या प्रश्नावर कधीच उपाय सापडणार नाही.
स्मार्ट सिटीअंतर्गत ठिकठिकाणी मनपाने भूमीगत कचराकुंड निर्माण केले आहेत. नागरिकांनी त्यामध्ये कचरा टाकावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, अशी महानगरपालिकेची किमान अपेक्षासुद्धा नागरिक पूर्ण करत नाहीत. भूमीगत कुंडांपर्यंत जाऊन तेथे कचरा टाकण्याचे कष्ट बेळगावकरांना नको आहे. त्यामुळे ठिकठिकाणी या कुंडांच्या सभोवतीच कचरा साचलेला पहायला मिळत आहे.
कचरा कुंडात टाका आणि सहकार्य करा!
भाग्यनगर येथील केएलएस इंग्रजी शाळेच्या समोरच भूमीगत कचराकुंड आहे. महानगरपालिकेने तेथे कचरा कुंडात टाका आणि सहकार्य करा, अशा आशयाचा फलकही लावला आहे. परंतु या कुंडाच्या सभोवतीच कचरा टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती आरपीडीजवळील भूमीगत कचराकुंडाची आहे. तसेच कधी कधी हे कुंड कचऱ्याने भरल्यानंतर त्याची वेळेवर उचल न झाल्यास नागरिक आसपास कचरा टाकून मोकळे होतात, हे ही वास्तव आहे. सध्या स्वच्छता हीच सेवा समजून संपूर्ण देशभरात स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु नेहमीच नियमाला अपवाद असणारे बेळगाव याबाबतही मागे नाही. शहर स्मार्ट करण्याचा आटापिटा प्रशासन करत असले तरी जोपर्यंत नागरिक स्मार्ट होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही सोयी-सुविधा यांच्यावरील खर्च हा निव्वळ पैशांचा अपव्यय ठरणार आहे. आता लोक स्मार्ट व्हायला हवेत की यंत्रणा स्मार्ट व्हायला हवी? या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्यानेच द्यावयाचे आहे.









