प्रतिनिधी/ पणजी
एका बाजूने राज्याची अर्थव्यवस्थाच कॅसिनोंच्या टेकुवर निर्धारून असल्याचे जाहीरपणे सांगायचे आणि आता त्याच कॅसिनोंच्या जाहिराती ‘जी20’ परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधी/पाहुण्यांनी पाहू नयेत म्हणून त्या लपविणे, हा प्रकार ढोंगी आणि बेईमानीपणाचा आहे, असे परखड मत पणजी मनपाचे नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी व्यक्त केले आहे.
मांडवीत तरंगणाऱ्या कॅसिनोकडून राजधानी शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी शेकडो बॅरिकेडस् पुरविले आहेत. त्याच बॅरिकेडस्च्या माध्यमातून त्यांनी स्वत:ची जाहिरातही केली आहे. कित्येक वर्षे हे बॅरिकेडस् शहरात जागोजागी ठेवलेले दिसत आहेत. तरीही त्यावर कुणीही आक्षेप घेतला नव्हता.
आता जेव्हा राज्यात जी20 परिषद होऊ घातली आहे. त्यानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांनी या जाहिराती पाहू नयेत यासाठी त्या बॅरिकेडस् वरील कॅसिनोंची नावे कपडा लावून झाकण्यात आली आहेत. एवढा खटाटोप करण्यापेक्षा सरकारने हे संपूर्ण बॅरिकेडस्च तेथून हटविले पाहिजे होते, असे फुर्तादो यांनी म्हटले आहे.
खरे तर कॅसिनो हे भाजप सरकारचे एटीएम आहेत. त्यांच्याकडून मिळणारा महसूल, प्रायोजकत्व, मतदान निधी, नोकऱ्या, वैयक्तिक करमणूक यासाठी कॅसिनोवर अवलंबून आहे. एवढेच नव्हे तर काही ठराविक भाजप पदाधिकाऱ्यांची हॉटेल्स देखील कॅसिनोंना पूर्णपणे भाड्याने देण्यात आली आहेत. अशाप्रकारे एवढ्या मोठ्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेले असताना सरकारने त्याच कॅसिनोंच्या जाहिराती मात्र लपविणे ही बेईमानी आहे, अशी टीका फुर्तादो यांनी केली आहे.
पणजीकरांना आता कॅसिनोंची सवय झाली आहे. त्याचबरोबर काही आमदार आणि भाजप सरकार हे प्रारंभापासूनच कॅसिनो लॉबीचे मित्र आहेत हे सत्य त्यांनी स्वीकारले आहे. परंतु हेच सत्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पाहुण्यांसमोर मात्र भाजपकडून लपविण्यात येते हे योग्य नव्हे, असे फुर्तादो यांनी म्हटले आहे.
अशा प्रकारे लपवाछपवी करण्यापेक्षा गोव्यातील भाजप सरकार स्वत:च्या अस्तित्वासाठी पूर्णत: कॅसिनोंवर अवलंबून आहे हे सत्य जगासमोर आले पाहिजे, अशी इच्छा फुर्तादो यांनी व्यक्त केली आहे.









