अध्याय एकोणीसावा
भगवंत म्हणाले, ज्ञानाचे महत्व मी तुला सविस्तर एव्हढय़ाचसाठी सांगितले की, तू ज्ञानासहित आत्मस्वरूपाला जाणून घ्यावेस आणि नंतर ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन भक्तिभावाने माझे भजन करावेस. जीव आणि परमात्मा दोन्ही एकच आहेत असे जाणणे हे ज्ञान होय आणि ऐक्मयभावनेने परमात्मसुख भोगणे ह्याचे नाव विज्ञान होय. अशा रीतीने जो ज्ञानविज्ञानसंपन्न होतो तो माझ्याशी एकरूप होतो. अशी एकरूपता साधल्यावर माझे भजन करावे. उद्धवा ! ह्या भजनाचा परिणाम कसा होतो ते ऐक. तो जेथे जेथे, जे जे कांही पाहतो, तेथे तेथे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही. अशाप्रकारे माझे अनन्य भजन करणे ह्याचेच नांव ‘शुद्धभक्ति’ हे लक्षात ठेव. पूर्वी मोठमोठाले मुनिवर्य ह्याच रीतीने माझी एकनि÷ भक्ती करून मला पावले. ते यज्ञाच्या स्वामीला म्हणजे मला श्रीअनंताला निजबोधाने संतुष्ट करतात. त्यात पूर्णाहुतीसाठी जीवभावाची आहुती देतात. जिवाभावाची आहुती दिली म्हणजे मी यज्ञभोक्ता श्रीनारायण परमात्मा संतुष्ट होतो. ह्याप्रमाणे माझे यजन करून अनेक मुनीश्वर जन्ममरणातून सुटून ते माझ्या स्वरूपाला पोचले. मोठमोठय़ा ऋषींनी जी सिद्धी साध्य करून घेतली, तीच उद्धवालाही प्राप्त व्हावी, म्हणून कृपासागर श्रीकृष्ण त्याला, प्रपंचाचा निषेध करून वस्तुतत्त्व सांगत आहेत. ते म्हणाले, हे उद्धवा ! देह, इंद्रिये व देवता यांचा समुदाय असलेले शरीर ही केवळ माया आहे याचाच तू आश्रय घेतला आहेस हे आधी व शेवटी नसून मध्येच असते. जन्म इत्यादी सहा विकारसुद्धा याचेच असतात. जे आधी असत नाही, शेवटी असत नाही, ते मध्येही असत नाही अशा या शरीराशी तुझा काहीच संबंध नाही. ‘मी उद्धव आहे’ असे म्हणतोस पण खरोखर तू कोण आहेस ? तुझं स्वरूप कसं आहे ते सविस्तर सांगतो ऐक. जन्म, स्थिती आणि मरण ह्या तीन विकारांना कारण त्रिगुण आहेत आणि त्यांची अधि÷ात्री माया आहे पण तिला तुझ्यापासूनच चलन मिळते. माया आदिकरून सर्व गुणांच्या सर्व कार्यांना अंतर्बाह्य तुझाच आश्रय आहे. तुझ्यामुळेच त्यांना चपलता म्हणजे चलनवलन प्राप्त झाले आहे. तू त्यांच्याहून भिन्न असा चिदात्मा आहेस.
स्वतःमुळे गुणकर्माना चलनता आली आहे असे म्हंटले, तर प्रपंचाला सत्यता आली असे वाटेल, पण तसे नव्हे. कारण खरोखर हे सर्व जग मायामय असून शुद्ध मृगजळासारखा भास आहे. प्रपंचाचे सारे भान हे तर मृगजळासारखे आहे. जे जे काय दिसते ते सर्व मिथ्या होय. खरोखर सत्य नव्हे. तू जन्ममरणाहून निराळा त्रिगुणांना न शिवणारा आणि खरोखर प्रपंचापासून अलिप्त आहेस. कसा ? ते ऐक. उत्पत्ती, स्थिती व लय यांच्यामध्येही प्रपंचाचे खरे अस्तित्व नाही. उत्पत्तीच्या आधी प्रपंच नसतो आणि अंतीही काही राहिलेला दिसत नाही. मध्यंतरी जो त्याचा भास होतो तोही मायामय असल्यामुळे मिथ्या होय. प्रपंचाच्या म्हणजे सृष्टीच्या आधी परब्रह्मच असते, अंतकालीही निरुपम असे तेच शिल्लक राहते आणि सृष्टीच्या स्थितीकालीसुद्धा ते ब्रह्मच असते. भ्रांति÷ लोकांना मात्र संसाराचा मिथ्या भ्रम होतो सूर्याच्या आधीही मृगजळ असत नाही, अस्तमान झाल्यानंतरही उरलेले दिसत नाही, मध्यंतरी जो काही भास होतो, त्यातही पाण्याचा लेशसुद्धा नसतो. रज्जुसर्पाच्या आधीही दोर असतो आणि शेवटीही दोरच शिल्लक राहतो. मध्यंतरी भ्रमाने सर्पाचा आकार भासतो, पण तोही दोरच असतो. हे उद्धवा ! याप्रमाणे आदी आणि अंती विचार केला असता ब्रह्म हेच सत्य असून, प्रपंच (जग) खरोखरच मिथ्या आहे आणि वेदशास्त्रार्थालाही हेच संमत आहे. अशी या प्रपंचाची कितीही घडामोड झाली व कितीही जन्ममरणाच्या कोटि गेल्या, तरी उद्धवा! त्यांचा तुला संपर्कही लागावयाचा नाही. कारण तू प्रवृत्ती व निवृत्ती ह्या दोन्ही तीरांपासून नित्यमुक्तच आहेस. उद्धवा! निर्गुण, निःसंग, निर्विकार, अज, अव्यय, अक्षर, अनंत आणि अपरंपार असे जे ब्रह्म, तेच खरोखर तू आहेस.
क्रमशः