चिपळूण :
सध्या शेतकऱ्यांना गरज असतानाही युरिया खताचा येथे तुटवडा भासत आहे. तालुक्यासाठी १ हजार मेटीक टन खताची गरज असतानाही ५०० मेटीक टन खत येथे उपलब्ध झाले होते. यामुळे ज्यांना खत मिळालेले नाही, असे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मनसे २३ रोजी तालुका कृषी कार्यालयावर धडक देणार आहे.
गेल्या काही वर्षांचा विचार करता बदलणाऱ्या नैसर्गिक घडामोंडीमुळे शेतकरीवर्ग अडचणीत येताना दिसत आहे. त्यातच मजूर मिळत नसल्याने शेती करण्याचे प्रमाणही कमी होत आहे. असे असताना जे शेतकरी शेती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनाही शासन वेळेत आवश्यक सुविधा देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
यावर्षीचा विचार करता मे महिन्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पेरणीची कामे लांबली. त्यानंतर शेतीच्या हंगामाला सुरूवात होताच पाऊस गायब झाला. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असतानाच आता युरिया खताची गरज असताना तेच उपलब्ध होत नसल्याने या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तालुक्याचा विचार करता येथे युरिया खताची १ हजार मेट्रीक टन इतकी मागणी आहे. मात्र आतापर्यंत ५०० मेट्रीक टन इतकेच खत उपलब्ध झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर येत्या ८ दिवसात खत उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
- मनसे देणार धडक
या बाबत बोलताना मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले म्हणाले की, अनेक संकटांमुळे कोकणातील शेतकरी हताश आहे. त्यात शासन त्यांना अधिक उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे २२ तारखेपर्यंत खत उपलब्ध केले नाही तर मनसेस्टाईल वापरली जाईल, असा इशारा आपण तालुका कृषी अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिला असून त्यांच्या कार्यालयावर धडक दिली जाणार असल्याचे सांगितले.








