विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : शाळेत तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी
वार्ताहर /सांबरा
शहर विभागात सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणबर्गी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये सध्या शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी शहर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने येथे शिक्षकांची नियुक्ती करावी, अशा मागणीचे निवेदन शनिवारी शाळा सुधारणा कमिटी व ग्रामस्थांनी शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालयात दिले आहे. येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून येथे विद्यार्थ्यांची पटसंख्या 200 आहे. साधारण दोन-तीन महिन्यापूर्वी येथील शाळेमध्ये दहा शिक्षक होते. मात्र शारीरिक शिक्षकासह अन्य एका नियमित शिक्षकाची बदली करण्यात आली व गेल्याच आठवड्यात एका शिक्षिकेची प्रतिनियुक्तीवर इतर शाळेत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षकांची संख्या सातवर येऊन पोहोचली आहे. शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार अजून किमान दोन शिक्षकांची या शाळेमध्ये आवश्यकता आहे. सध्या सोमवार दि. 9 पासून दसऱ्याच्या सुटीला प्रारंभ झाले आहे. निदान सुटीनंतर तरी शहर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने येथे शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शाळेची पटसंख्या टिकून
एकीकडे सरकारी शाळेतील पटसंख्या घटत असताना येथील शाळेमध्ये मात्र पटसंख्या टिकवून ठेवण्यामध्ये शाळा सुधारणा समितीला यश आले आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार येथील शाळेत जादा शिक्षक नेमणे गरजेचे आहे.
गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांची नेमणूक त्वरित करावी
येथील सरकारी मराठी शाळेमध्ये सध्या शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षकांच्या नेमणुकीसंदर्भात निवेदन देण्यात आले असून शहर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी लवकरच शिक्षकांची नेमणूक करावी.
– किसन सुंठकर एसडीएमसी अध्यक्ष कणबर्गी.









