मंडणगड :
सहकारी चळवळीच्या माध्यमातून तालुक्यात दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती होत असताना पशुसंवर्धन विभागाची अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व पशु वैद्यक शास्त्राच्या दृष्टीने आवश्यक साधनांच्या अभावामुळे दमछाक होताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यात दुग्ध उत्पादने व दुधाळ जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झालेली असताना दुसऱ्या बाजूला अपुरे संख्याबळ व असुविधा या वाढीस मारक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ९ पशुवैद्यकीय दवाखान्यातील २१ पदे रिक्त आहेत.
तालुक्यात खासगी पशु वैद्यकीय दवाखानेही नाहीत. त्यामुळे पाळीव पशुधनास आजार झाल्यास दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना तालुक्यात उपलब्ध शासकीय सुविधांवरच अवलंबून रहावे लागते. तालुक्यात मंडणगड, लाटवण, शेनाळे, कुंबळे, दहागाव, म्हाप्रळ, पालवणी, देव्हारे,वेळास असे ९ पशुवैद्यकीय दवाखाने असून यातील ६ दवाखाने राज्यशासनाचे, तर ३ जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहेत. तसेच मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेच्या माध्यमातून फिरता दवाखाना आहे.
- ३३ पैकी केवळ ११ पदे भरली
तालुक्यात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यातील केवळ ११ पदे भरण्यात आली आहेत. २२ कर्मचाऱ्यांची पदे शासकीय भरती होत नसल्याने रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे पशुधन विकास अधिकाऱ्यांची ८ पदे, पशुधन पर्यवेक्षकाची ७ अशी एकूण १५ महत्वाची पदे दवाखाना सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असताना भरली गेलेली नाहीत. ५ शिपायांची पदे रिक्त आहेत. तालुक्यात सद्यस्थितीत केवळ ३ पशथुन विकास अधिकारी व ३ पशुधन पर्यवेक्षक कारभार पाहत आहेत. तालुक्याची डोंगराळ संरचना लक्षात घेता हा आकडा कार्यरत कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार टाकणारा आहे.
- तांत्रिक साधनांची कमतरता
पाळीव कुत्रे व मांजर असे प्राणी आजारी पडल्यास वा दुखापतग्रस्त झाल्यास दवाखान्यात आणले जातात. गाई, म्हशी, बैल इत्यादी प्राण्यांना आजार झाल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जागेवर भेटीसाठी जावे लागते, यात बराच वेळ वाया जातो. त्यामुळे कर्मचारी भरतीचा रिक्त अनुशेष तातडीने भरून काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पाळीव पशुधनास गंभीर आजार झाल्यास अथवा तातडीने शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास तशी सोय केवळ तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे. पाळीव पशुधनाचे विविध आजारांचे निदान करण्यासाठी गरजेच्या तांत्रिक साधनांचीही आवश्यकता असतानाही ती उपलब्ध नाहीत. त्यामुळे अडचण होताना दिसून येत आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांचा प्रचार प्रसार व प्रशासकीय कागदपत्रांचे सोपस्कर पूर्ण करण्यातही कर्मचाऱ्यांचा वेळ खर्च होत आहे.
- तालुक्यातील श्वेत क्रांतीला बळ द्यावे
तालुक्यात दुग्ध उत्पादनास पोषक वातावरण आहे. गेल्या काही वर्षात दुग्ध उत्पादने व दुधाळ जनावरांची संख्या वाढत आहे. मात्र त्याच्या संवर्धनासाठी आवश्यक मनुष्यचळ व साधनसामुग्री तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध होत नसेल तर हा आलेख चढता ठेवणे कठीण जाणार आहे. त्यामुळे येथील श्वेत क्रांतीला पाठबळ देण्यासाठी शासकीय यंत्रणेने त्यादृष्टीने सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया येथील दुग्धोत्पादक शेतकरीवर्गातून उमटत आहे.








