3,115 मंजूर पदांपैकी 1826 पदे रिक्त : दैनंदिन कामकाजावर परिणाम, रिक्त पदे भरण्याची मागणी
बेळगाव : महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. कमी मनुष्यबळामुळे शहर आणि परिसरातील नागरिकांना सेवा-सुविधा व लोकाभिमुख प्रशासन देणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात 1 महानगरपालिका, 2 नगरपालिका, 19 नगरपंचायती आहेत. शहरांच्या स्वच्छता राखण्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. दरम्यान, प्रशासकीय कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिक्तपदांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी दुहेरी कामाच्या ताणाने कंटाळले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 3115 मंजूर जागांपैकी 1826 पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर कमी मनुष्यबळामुळे परिणाम होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. ग्रुप ए मध्ये 40 टक्के, ग्रुप बी मध्ये 45 टक्के आणि ग्रुप सी मध्ये 65 टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. या व्यतिरिक्त दरवर्षी 50 हून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होतात. या सर्व कारणांमुळे कर्मचाऱ्यांची कमतरता वर्षानुवर्षे वाढत आहे. कामाचा ताण अनेकदा इतका जास्त असतो की सामान्यत: तीनजण जे काम करतात, ते काम एकाच कर्मचाऱ्याला करण्याची वेळ आली आहे. अशावेळी कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही
पाणीपुरवठा साहाय्यक, संगणक ऑपरेटर, वाहनचालक, सफाई कर्मचारी, लोडर, क्लिनर, व्हॉल्वमन यासारख्या इतर पदांवर 1911 कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही तर काहीजण पगाराविना नोकरी सोडत आहेत. अशा परिस्थितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नागरिकांना योग्य सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. रिक्तपदांचा दैनंदिन कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. बहुतेक पदे एफडीए, एसडीए, आरोग्य निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी आहेत. त्यामुळे स्वच्छता कामात अडथळे निर्माण झाले आहेत.
काही वर्षांपूर्वी यरगट्टी, मच्छे, पिरनवाडी, अंकलगी, अरभावी आणि इतर गावांचा नगरपंचायतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुनवळ्ळी, घटप्रभा, मुगळखोड, हारुगेरी, कोन्नूरसह इतर गावे नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार त्याठिकाणी पदे निर्माण करण्यात आली आहेत. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया अद्याप वेगवान झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिक्त असलेल्या पदांमुळे ई-खाता देणे, कर संकलन इत्यादींसह इतर कामे सुरू आहेत. दिलेले काम लवकर न होणे, विनाकारण विलंब लावणे, एखाद्यावेळी विचारणा केल्यास कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन तातडीने रिक्त पदे भरण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.









