कागदपत्रांच्या पडताळणीसाठी होतोय विलंब
बेळगाव : पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी पोस्ट-पासपोर्ट सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या मात्र अत्यल्प आहे. यामुळे कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्ध्या दिवसाचा कालावधी जात आहे. वेळ वाया जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे पासपोर्ट सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. नागरिकांच्या मागणीनुसार 5 ते 6 वर्षांपूर्वी कॅम्प येथील हेड पोस्ट ऑफिस येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. पोस्ट कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन पासपोर्टसाठीच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. आधीच कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची वानवा असतानाच त्यातीलच काही कर्मचारी पासपोर्ट सेवा केंद्राला देण्यात आले आहेत.
कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी दोन काऊंटर असून उर्वरित एका काऊंटरवर फोटो तसेच इतर कागदपत्रे घेतली जातात. सध्या दिवसाला 75 ते 80 अपॉइंटमेंट दिली जात आहेत. नागरिक आपल्या ठरलेल्या वेळेनुसार कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सेवा केंद्रामध्ये दाखल होत आहेत. परंतु कागदपत्रांच्या पडताळणीसाठी केवळ दोनच कर्मचारी असल्याने विलंब होत आहे. संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक पासपोर्टसाठी बेळगावमध्ये येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दीही होत आहे. त्यामुळे केवळ अर्ध्या तासाच्या कामासाठी अर्धा दिवस थांबावे लागत आहे. बेळगाव पोस्ट विभागाने दोन वर्षांपासून सेवा केंद्राला स्वतंत्र जागा दिली आहे. परंतु नागरिकांची संख्या वाढत असल्याने जागा अपुरी पडत आहे. कार्यालयाबाहेरील खुल्या जागेचाही वापर बसण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्याची मागणी बेळगावमधील नागरिकांमधून होत आहे.









