पोस्ट विभागाकडे मर्यादितच कव्हरचा पुरवठा, ग्राहकांकडून मागणी वाढली
बेळगाव : रक्षाबंधन अवघे चार ते पाच दिवसावर येऊन ठेपल्याने राखी पाठविण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू आहे. परंतु बेळगाव पोस्ट विभागात राखीसाठीच्या कव्हरचा तुटवडा असल्याने नागरिकांना इतर ठिकाणांहून अधिक पैसे खर्च करून कव्हर खरेदी करावे लागत आहे. यामुळे राखी पाठविणाऱ्या बहिणींना आर्थिक फटका बसत आहे. आजही रक्षाबंधनासाठी मोठ्या प्रमाणात पोस्टाने राख्या पाठविल्या जातात. साध्या पोस्टसोबतच स्पिड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट यानेदेखील राखी पाठविली जात आहे. मागील पंधरा दिवसापासून राखी पाठविण्यासाठी मुख्य पोस्ट कार्यालयासह शहरातील विविध पोस्ट विभागात महिलांची गर्दी होत आहे. पोस्टविभागाने खास राखीसाठी पंधरा रुपयांचे कव्हर उपलब्ध करून दिले होते. हे वॉटरप्रूफ कव्हर असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे काही दिवसातच हे वॉटरप्रूफ कव्हर संपले. नागरिकांकडून मागणी होत असली तरी मर्यादित कव्हर बेळगाव विभागाला आल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबरोबरच 5 रुपयांच्या कव्हरचा तुटवडा वारंवार जाणवत आहे. यामुळे पोस्टविभागाने मुबलक कव्हर उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
5 रुपयांचे कव्हर उपलब्ध…
राखीसाठीचे स्पेशल कव्हर मर्यादितच आले होते. वॉटरप्रूफ असल्यामुळे नागरिकांची या कव्हरला मागणी होती. परंतु मर्यादित कव्हर आल्याने आम्हाला सर्व ग्राहकांना ती देता आली नाहीत. 5 रुपयांचे कव्हर उपलब्ध असून ग्राहकांनी या पोस्ट कव्हरचा वापर करावा.
– विजय वडोनी,(पोस्ट अधिक्षक बेळगाव)









