पशुपालक सकस वैरणापासून राहणार वंचित : जनावरांच्या तुलनेत दिलेल्या बियाणांच्या बॅगा अल्प प्रमाणात
बेळगाव : जिल्ह्यात 28 लखांहून अधिक जनावरे आहेत. मात्र या जनावरांसाठी सकस आहार देण्याबाबत सरकारनेच शेतकऱ्यांची आणि जनावरांचीही चेष्टा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिल्ह्याला केवळ 17 हजार सकस बियाणांचे बॅग उपलब्ध केल्या आहेत. मात्र जनावरांच्या तुलनेत देण्यात आलेल्या बियाणांच्या बॅग अल्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ही बियांणे घेण्यापेक्षा खासगी दुकानदारांकडूनच खरेदी करावी लागणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना या बियाणांपासून वंचित रहावे लागणार आहे. जनावरांना सकस आहार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात बाजरी, मका आणि ज्वारी बियाणे आली आहेत. यामध्ये आफ्रीकन टॉल जातीच्या मका बियाणाचा समावेश आहे. त्यामुळे जनावरांना सकस चारा उपलब्ध होणार आहे. मागील दोन वर्षांत पशुसंगोपनकडून बी-बियाणांचे वितरण रखडले होते. मात्र यंदा पूर्ववतपणे बी-बियाणे वितरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात अर्धा किलो वजनाची 10 हजार 804 बाजरी पाकिटे, पाच किलो वजनाची 3 हजार 701 ज्वारी बॅग आणि 6 किलो आफ्रीकन टॉल जातीचे 1448 मका पाकिटे आली आहेत.
बियाणांचा अल्प पुरवठा
जनावरांना चांगल्या प्रतिचे वैरण उपलब्ध व्हावे यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत बी-बियाणे दिली जातात. या बियाणांची पेरणी करून जनावरांना सकस आहार उपलब्ध करून दिला जातो. मात्र यंदाच्या रब्बी हंगामाच्या तोंडावर केवळ जिल्ह्यासाठी बियाणांचा अल्प पुरवठा करण्यात आला आहे. याला कारण म्हणजे पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आलेले अनुदान हे अल्प आहे. त्यामुळे अधिक पुरवठा करणे अशक्य झाले आहे.
बी-बियाणांचा जादा पुरवठा करण्याची मागणी
यंदा पावसाअभावी चारा संकट धुसर बनत चालले आहे. त्यातच शासनाकडून मुबलक चारा उपलब्ध व्हावा यासाठी कोणत्याच उपाय योजना केल्या जात नसल्याचेही दिसत आहे. जिल्ह्यासाठी केवळ बी-बियाणांचा अल्प पुरवठा झाल्याने चारा संकट कायम राहणार आहे. शासनाने पशुपालकांसाठी जादा बी-बियाणांचा पुरवठा करावा, अशी मागणीही होवू लागली आहे.









