जनतेने पुढे येण्याची गरज : महापालिका अधिकाऱ्यांकडून आवाहन
बेळगाव : शहरातील मालमत्तांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने सर्व मालमत्तांची डिजिटल नोंद करावी, असा आदेश दिला आहे. मात्र शहरातील जनतेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ 30 ते 40 टक्के लोकांनीच डिजिटलायझेशनसाठी नोंद केली आहे. याबाबत जनजागृती करण्यात आली. मात्र म्हणावा तसा प्रतिसाद जनतेतून मिळाला नसल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासन संचालनालयाकडून संगणकीय नोंद करण्यासाठी सूचना करण्यात आली. त्यानुसार आम्ही जनजागृती केली. मात्र अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. जनतेने यासाठी पुढे यावे. जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. मालमत्ता डिजिटलायझेशनमुळे योग्यप्रकारे भविष्यात संबंधित मालकांना कागदपत्रे मिळणार आहेत. पण यासाठी स्वत:हूनच पुढे येणे गरजेचे आहे.
डिजिटलायझेशनसाठी संबंधित मालमत्तेचे जीपीएसद्वारे छायाचित्र घेतले जाणार आहे. संबंधित मालकाचे छायाचित्र, ओळखपत्र-त्यामध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर ओळखपत्रे द्यावी लागणार आहेत. सदर मालमत्ता ही आपलीच आहे, याबाबतची संपूर्ण कागदपत्रे देणेदेखील बंधनकारक आहे. सीटीएस एक्स्ट्रॅक्ट, खरेदी असेल तर त्याबाबतची संपूर्ण कागदपत्रे, एनए लेआऊटबाबत नकाशा यासह इतर कागदपत्रे देणे महत्त्वाचे आहे. वीजबिल, पाणीबिल, मालमत्ता कर भरलेली पावती, बांधकाम परवाना पत्र यासह इतर कागदपत्रे देऊनच याची नोंद करता येणार आहे. तेव्हा जनतेने संबंधित महसूल विभागात जाऊन ही कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. दक्षिण विभाग महसूल कार्यालय, पहिला मजला, गोवावेस येथे संबंधित कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. याचबरोबर आपल्या विभागामध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या महसूल कार्यालयामध्ये संबंधितांनी कागदपत्रे जमा केल्यास मालमत्तेची डिजिटल नोंद केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.









