लेटर बॉम्ब’चा शोध मात्र जारी : ‘शाकाहारी’ खंडणीही झाली रद्द
पणजी : उत्तर गोव्यातील खंडणी प्रकरण उघडकीस आल्यानंतर तसेच ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणाने काही राजकीय नेत्यांची दाणादाण उडवून दिल्यानंतर आपसूकच खंडणी बहाद्दरांनी आपली दुकाने सध्या बंद केली आहेत. त्यामुळे रविवारपासून गोव्यातील विशेषत: उत्तर गोव्यातील काही रेस्टॉरंटची खंडणी स्थगित झाली आहे. प्राप्त माहितीनुसार गेल्या आठवड्यात प्रकरण उघडकीस येण्याच्या काही दिवस अगोदरपासून किनारी भागातील अनेक हॉटेल चालकांना ऊपये 50 हजारपासून ऊपये तीन लाखपर्यंत खंडणीचा दर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत खंडणी बहाद्दरने निश्चित केला होता. हे प्रकरण आमदार मायकल लोबो यांनी उघडकीस आणल्यानंतर त्यावर सरकारने फारशी गंभीरपणे दखल घेतली नाही. मात्र लेटर बॉम्ब प्रकरणाने अनेक राजकीय नेत्यांची झोपच उडवून दिली.
‘लेटर बॉम्ब’ तयार केला कोणी?
लेटर बॉम्ब म्हणजे सदर पत्र कोणी तयार केले, याची चौकशी अद्याप चालू आहे मात्र पत्र बोगस आहे, असे सरकारने पोलिसांचा हवाला देऊन जाहीर केले. तथापि हा लेटर बॉम्ब पडला नसता तर रविवारी दुसरी एक बैठक खंडणी बहाद्दरने घ्यायचे ठरवले होते. मात्र आता त्याच्यावरही दबाव आला असून त्याने ही बैठक घेण्याचे धाडस दाखविले नाही. दुसऱ्या टप्प्यांमध्ये उत्तर गोव्यातील अनेक शाकाहारी व मांसाहारी खानावळींना खंडणीची काही रक्कम निश्चित केली जाणार होती. त्यासाठीचे अंदाजपत्रक देखील तयार झाले होते, मात्र आदेश आला आणि हा खंडणीचा ‘कार्यक्रम’ रद्द करण्यात आला. यामुळे अनेक हॉटेलचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.









