सावळज / रमेश मस्के :
शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. बेंदूर साजरा करण्यासाठी आवश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली असून गावांतील दुकाने विविध सजावटीच्या वस्तूंनी सजली आहेत.
बेंदूर सणाच्या निमित्ताने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दुकाने थाटली जात आहेत. या दुकानांमध्ये बैलांसाठी लागणारे विविध सजावटीचे साहित्य, मातीचे बैल आणि इतर आवश्यक वस्तू मिळतात. बाजारात बैलांसाठी साजशृंगाराच्या वस्तूंमध्ये झूल, मांड, कवड्या, घंटा, हार-फुले, गळ्यातील घुंगरमाळ, कपाळाचे बाशिंग, बेगडे, शिंगाचे गोंडे, बैलांना रंग, रंगीत पट्ट्या, बैलांच्या अंगावर बांधायचे विविध प्रकारचे कापड झूल अशा साहित्याने बाजारपेठ भरलेली आहे. चालू वर्षी बाजारपेठेतील दुकाने फुलली आहेत. तसेच विविध रंगांमध्ये आणि आकारांमध्ये मातीचे बैल ही दुकानात विकायला ठेवण्यात आले आहेत.
बेंदूर सणामुळे ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. वर्षभर शेतात काम करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. बेंदूर हा केवळ सण नसून शेतकऱ्यांच्या कष्टात साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या सणाला ग्रामीण भागात मोठे महत्व असून, या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये उत्साहाचे व मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैल जोड्यांची संख्या कमालीची घटली आहे. मात्र असे असताना अनेक हौशी शेतकरी बैलांचे संगोपन करत आहेत. या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. बैलांच्या संख्येत घट झाल्याने साहित्य खरेदीत ही घट झाली आहे. ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांपासून बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याचा बाजार भरत आहे. सावळज परिसरात दुकाने थाटली आहेत. मात्र शेतकऱ्यांची गर्दी कमी असल्याचे दिसून येते








