वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानातील कराची शहरातील एका मॉलमध्ये शनिवारी आग लागली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 22 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रशीद मिन्हास रोडवरील आरजे मॉलमध्ये आग लागल्यानंतर इमारतीत अनेक लोक अडकले. अग्निशमन दलाने सुमारे 50 जणांना वाचवले आहे. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही, असे कराचीचे महापौर बॅरिस्टर मुर्तझा वहाब यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
मॉलच्या इमारतीमध्ये कॉल सेंटर आणि सॉफ्टवेअर हाऊससारखी मोठी दालने होती. येथे एअर कंडिशनर्स (एसी) 24 तास चालत असत. एसीमुळे आग लागली असावी, असा अग्निशमन दलाचा अंदाज आहे. मात्र, आगीचे नेमके कारण शोधले जात आहे. याचदरम्यान, कराचीमध्ये बांधलेल्या 90 टक्के इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचा प्रकार उघड झाला असून या घटनेनंतर जनतेच्या सुरक्षेबाबत सरकारवर टीकेचा भडिमार होत आहे.
मॉलमध्ये आग खूप वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच आम्ही लगेच मॉलमध्ये पोहोचलो. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या लागल्या. वीकेंड असल्याने येथे खूप गर्दी होती. सकाळी सातच्या सुमारास मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग काही वेळातच सहाव्या मजल्यापर्यंत पसरल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.









