सोने-चांदीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंना पसंती : घर खरेदीबरोबरच घरप्रवेशही उत्साहात
बेळगाव : नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. नवीन वर्षामध्ये नवीन खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाली होती. रविवारी सकाळपासूनच सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घर खरेदी व बुकिंग करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. सकाळी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती. नववर्षाचे स्वागत देवदर्शनाने करण्यात आले. नवीन वर्षानिमित्त घरांमध्ये पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पुरणपोळी, श्रीखंड-पुरी, बासुंदी अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारनंतर बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. काहींनी आपल्या घरातील लग्नाचा बस्ता गुढीपाडव्याला खरेदी केला. इतर वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू होती.
इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी जोमात
गुढीपाडव्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल, कूलर, सोने यासह इतर वस्तू खरेदी करण्यात आल्या. यामुळे बाजारात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी झाली होती. सोन्याचा दर वाढलेला असला तरी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. सोन्यासोबतच ठोक स्वरुपातील चांदी खरेदी करण्यात आली. बऱ्याच दिवसांनी दुचाकी व चार चाकी वाहन क्षेत्रात मोठी उलाढाल झाली. वाहनांचे अॅडव्हान्स बुकिंग करून रविवारी त्या वाहनांचा ताबा घेण्यात आला. यामुळे दुचाकींसह चार चाकी वाहन शोरुम्समध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. या वाहनांसोबत व्यावसायिक वाहनेही घेण्यात आली. डिझेल, पेट्रोलसोबत आता इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी ग्राहक इच्छुक असल्याचे दिसून आले.
गृहखरेदीला प्रतिसाद
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश तसेच नवीन घरांचे बुकिंग करण्याकडे नागरिकांचा कल होता. रविवारी अनेक ठिकाणी गृहप्रवेश करण्यात आला. घरांसह फ्लॅटचा ताबा मिळविण्यासाठी खरेदीदारांची मागील काही दिवसांपासून धडपड सुरू होती. याबरोबरच नवीन फ्लॅट, प्लॉट व घर घेण्यासाठी बुकिंग करण्यात आले. यामुळे रविवार असतानाही बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये गजबजली होती.









