आकर्षक श्रीकृष्ण मूर्ती दाखल : फळ, फुलांना पसंती
बेळगाव : गोकुळाष्टमी एक दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारात गोकुळाष्टमीच्या खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. विशेषत: श्रीकृष्ण मूर्ती, मटकी, फळे, हार आणि इतर पूजेच्या साहित्याची खरेदी वाढली आहे. गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक श्रीकृष्ण मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गोकुळाष्टमीदिवशी विविध ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम होतो. यामुळे बाजारात मटकी दाखल झाली आहेत. श्रीकृष्ण मूर्ती विविध आकारामध्ये उपलब्ध झाल्या आहेत. श्रीकृष्ण मूर्तींच्या किमती 60 ते 600 रुपयांपर्यंत आहेत. याबरोबरच विविध फळे, फुले, पाने, बेल, दुर्वा, आदी पूजेच्या साहित्याची खरेदी होऊ लागली आहे. गोकुळाष्टमी आणि श्रावणमास सुरू असल्याने बाजार बहरलेला दिसत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात पारंपरिक गोकुळाष्टमी साजरी केली जाते. विशेषत: परंपरेनुसार दहीहंडीचे आयोजन केले जाते. त्यामुळे विविध आकारातील आकर्षक मटकी विक्रीसाठी दाखल झाली आहेत. गणपत गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी श्रीकृष्ण मूर्ती आणि मटकी पहावयास मिळत आहेत. बुधवारी गोकुळाष्टमी असल्याने नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती.
6 रोजी श्रीकृष्ण जन्मसोहळा- विविध कार्यक्रम
बुधवार दि. 6 रोजी गोकुळाष्टामीनिमित्त विविध मंदिरांतून श्रीकृष्ण जन्मसोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषत: मंदिरांवर विद्युत रोषणाई करून पूजेसाठी मंदिरे सज्ज करण्यात येणार आहेत.









