दिवाळीची खरेदी छोट्या दुकानदारांकडून करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले आहे. देशातील छोट्या व्यापाऱ्यांना या आवाहनामुळे किमान शाब्दिक दिलासा मिळालेला आहे. पंतप्रधानांची लोकप्रियता पाहता आणि त्यांच्या आवाहनाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता देशभरातील व्यापाऱ्यांना बऱ्याचअंशी साहाय्य मिळेल अशी शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांच्याकडून दिवाळीच्या खरेदीसाठी नेहमीच स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य दिले जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत: कोविडनंतर ऑनलाइन व्यवहारांचे प्रस्थ प्रचंड प्रमाणात वाढल्याने वेगवेगळ्या वेबसाईटवरून आणि अॅपच्या माध्यमातून कपडे, सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, घरगुती साहित्य, टीव्ही, मोबाइलसह वेगवेगळ्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू यापासून ते अगदी शाम्पू, साबण, स्वस्तात मिळणारे स्मार्ट वॉच इतकेच नव्हे तर पेंटिंगसह बऱ्याच वैविध्यपूर्ण वस्तूही ऑनलाइन माध्यमातून घरपोच मिळू लागल्या आहेत. विशेषत: दिवाळीची सर्वात मोठी खरेदी म्हणजे कपडे. मात्र आकर्षक आणि तयार कपड्यांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर या ऑनलाइन माध्यमाने व्यापलेली आहे. अगदी तीनशे, पाचशे रुपयांपासून तीन-पाच हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू लोक ऑनलाईन मागवत आहेत. या वस्तू पोहोचवणाऱ्यांचीसुद्धा एक मोठी साखळी गावोगाव निर्माण झाली आहे. यातील बहुतांशी वस्तू या देशातील कानाकोपऱ्यात तयार होतात, काही आयात असतात. या माध्यमातून त्यांनी निर्मिती ते पुरवठ्याची एक साखळीच उभी केलेली आहे. याचा परिणाम आपोआपच देशभरातील छोट्या दुकानदारांच्यावर झालेला आहे. या वस्तूंच्या बरोबरीनेच किराणा मालाच्या साहित्यासहित दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांना आता मोठमोठे मॉलसुद्धा खुणावू लागले आहेत. नऊ, दहा टक्के सवलतीच्या दरात, निवडक वस्तू मिळतात असा गवगवा होत असल्याने अशा मॉलमध्ये प्रचंड गर्दी दिसू लागली आहे. या सगळ्याचा परिणाम आपोआपच स्थानिक बाजारपेठेवर होतो. अनेक दुकानांमध्ये अद्यापसुद्धा दिवाळीची खरेदी सुरू झालेली नाही. जेथे थोड्याफार प्रमाणात खरेदी सुरू झालेली आहे, तिथला व्यापारी वर्ग गुंतवणुकीच्याबाबतीत चिंतातूर आहे. एकाचवेळी ऑनलाइन आणि मॉल संस्कृतीला टक्कर देताना गावोगावच्या छोट्या व्यापाऱ्यांची दमछाक होत आहे. अशा या व्यापारी वर्गाची सगळी मदार आहे ती, सर्वसामान्य माणसांवर. दिवाळीच्या तोंडावर ज्यांच्या हातात पैसा येतो किंवा हाती असलेल्या रकमेच्या जीवावर जे सण साजरा करायचा प्रयत्न करत असतात अशा ग्राहकवर्गाने या छोट्या व्यापाऱ्यांना तारलेले आहे. उधारी आणि परस्परांशी असलेला वर्षानुवर्षांचा संबंध या जोरावर इथला व्यवहार आणि नाते टिकून आहे. मोठे मोठे मॉल आणि ऑनलाइन माध्यमे जितकी आक्रमक जाहिरातबाजी करून आपल्या वस्तू सर्वात स्वस्त असल्याचा दावा करत असतात त्यापेक्षा कमी रकमेमध्ये आजही या छोट्या व्यापाऱ्यांकडे लोक खरेदी करत असतात. त्यांना या मॉल्सच्या दरामागील गोलमालाची पूर्ण कल्पना आलेली आहे. अनेक ठिकाणी फिरून, दराची तुलना करून सर्वसामान्य, गरीब आणि मध्यमवर्ग खरेदी करतो. त्यांच्या इतका या मोठ्या साखळी व्यवस्थांची बनवेगिरी जाणणारा दुसरा वर्ग नाही. मात्र अलीकडच्या काळात या वर्गाला आवाज राहिलेला नाही. त्यांची संख्या मोठी असली तरी त्यांचा आवाज क्षीण झालेला आहे. महागाईच्या झळा बसणारा हा वर्ग एका बाजूला आहे, त्यांच्या उत्पन्नामधील सर्वाधिक वाटा हा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च होत असतो. त्यामुळे या गोष्टींचा विचार करणे त्यांना क्रमप्राप्त असते. हातात पैसा खेळणारा आणखी एक वर्ग देशात आहे. ज्याच्यासाठी या जीवनावश्यक वस्तू आणि सणाच्या खरेदीचा खर्च हा त्यांच्या एकूण उत्पन्नात फारसे महत्त्व नसणारा खर्च आहे. त्यांच्या खर्चाच्या आणि चैनीच्या कल्पना वेगळ्या असल्याने आणि या वर्गाला डोळ्यासमोर ठेवूनच बाजारपेठांची रचना होत असल्याने त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांच्या आवडीनिवडी डोळ्यासमोर ठेवूनच सगळा व्यवहार होत असतो. सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील व्यक्ती आणि लहान मुलांच्यासाठी, विशेषत: टीन एजमधील मुलांसाठी टीव्हीवरील जाहिरातीतील खरेदी हे जणू स्वप्न बनून राहिलेले आहे. आपली आर्थिक उन्नती होईल आणि कधीतरी आपणही अशा पद्धतीच्या खरेदीमध्ये सहभागी होऊ असे या वर्गाचे स्वप्न बनलेले आहे. त्यांच्यासाठीसुद्धा कमी किंमतीचा ऑनलाईन बाजार सजलेला आहेच. मात्र हा वर्ग या सगळ्या भुलभुलय्यातून बाजूला होत आपल्या किमान गरजा आणि सणासुदीची खरेदी बऱ्याच प्रमाणात स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांकडून आणि काही प्रमाणात खिशाला परवडेल अशा ऑनलाइन माध्यमातून करत असतात. सणांची खरेदी म्हणजे स्वप्नांची पूर्तता करण्याचा एक प्रयत्न असतो. प्रत्येक वर्ग आपापल्या पद्धतीने आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या खिशाला परवडेल अशा ठिकाणी तो खरेदी करतो. अशा काळात पंतप्रधानांनी स्थानिक व्यापाऱ्यांसाठी जो शब्द खर्ची घातला आहे तो उपयोगात यावा आणि ज्या वर्गाकडे पैसा आहे, ज्यांना या छोट्या व्यापारी वर्गाला आधार देणे शक्य आहे त्यांनी आपली खरेदी किंवा आपल्याकडे काम करणाऱ्या सर्वसामान्य कामगारांची खरेदी अशा दुकानदारांकडून केली आणि अशा वर्गाला ती भेट स्वरूपात पुरवली तरीही छोट्या व्यावसायिकांना मोठा हातभार लागू शकेल. अर्थात हा झाला आदर्शवादी विचार. वास्तवात छोट्या व्यापारी वर्गानेसुद्धा स्पर्धेत उतरले पाहिजे, असे या पैसा असणाऱ्या वर्गाला वाटते. त्या वर्गाची मानसिकता बदलण्यासाठी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी पंतप्रधानांनी शब्द टाकला आहे, तो उपयोगात यावा. छोट्या व्यापाऱ्यांकडील दुकानातील खरेदी वाढावी. या क्षेत्रातील रोजगारसुद्धा अनेकांची घरे चालवतो. या व्यवस्थेला तर मदतीचा हात हवाच आहे. मोदी काळात ज्या वर्गाचे कल्याण झाले त्यांनी तो देण्यास काय हरकत आहे?
Previous Articleअनिश भनवालाला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट
Next Article ‘द लेडी किलर’चा ट्रेलर प्रदर्शित
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








