साहित्याचे दर स्थिर : नारळाचे दर वाढतेच
बेळगाव : गणेशोत्सव हा असा उत्सव आहे जो सर्वांना सामावून घेतो आणि राबणाऱ्या हातांना काम मिळवून देतो. त्यामुळे सामान्य आणि गरिबांच्या खिशात काही पैसे खुळखुळतात. शिवाय गणपती ही विद्येची देवता आहे आणि अनेकांचे ते आराध्यदैवत आहे. या दैवताची पूजा करण्यात कोणतीही उणीव भासू नये, यासाठी भाविक तत्पर असतात. हीच मानसिकता लक्षात घेऊन बाजारपेठेत बाप्पाच्या पूजेसाठीचे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. गणेशाची षोडशोपचार पूजा आजही केली जाते. त्यामुळे अथपासून इतिपर्यंत ही पूजा करताना अनेक पूजा साहित्याची गरज भासते. अर्थातच बाजारपेठेत पूजा साहित्याचे स्टॉल कायम असले तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांची संख्या वाढली आहे.
सुपारी, बदाम, खारीक, खोबरे, अत्तर, हळकुंड, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, अष्टगंध, खडीसाखर, धूप, जानवे आदी वस्तुंचा समावेश असलेले पाऊच उपलब्ध असून याची किमत 120 ऊपये आहे. अगरबत्ती व धूप 10 रुपयांपासून 700 ते 800 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तेल अर्धा किलोची बॉटल 180 रुपये, श्रीमूर्तीसाठी मोती हार 20 रु. ते 1200 रु., कलर पेपर 50 ते 80 रुपये डझन, किरीट 20 ते 200 रुपये, मेटल किरीट 100 चे 500 रु., ‘गणपती बाप्पा मोरया’ असे लिहिलेल्या टोप्या 10 ते 20 रु. प्रती नग, रिबन 10 रु. नग, प्लास्टिकच्या वेली 50 रु. नग, सजावट साहित्याचे दर स्थिर असून फक्त मोती हारांची किमत 20 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
घरगुती श्रीमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी रंगीबेरंगी चौरंग बाजारात आले आहेत. नारळाचे दर गेल्या तीन-चार महिन्य़ांपासून वाढतेच आहेत. आता सणासुदीचे दिवस असल्याने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 20 ते 60 रु. ला एक नारळ असा दर आहे. गणेशाच्या सजावटीसाठी कापसाच्या माळावस्त्रांची मागणी वाढते. कोणी याला गेजवस्त्र म्हणतात. आजही अनेक घरांमध्ये महिला स्वत:च या वाती वळतात. मात्र, आता गृहोद्योग स्वरुपात हे काम वाढले आहे.
फुलवाती, औक्षणाच्या वाती, गेजवस्त्र असे तयार करून त्यांची विक्री करून महिला घराला हातभार लावत आहेत. जे नवं ते हवं ही समूहमनाची मानसिकता लक्षात घेऊन वातींमध्येसुद्धा वेगळेपण आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. वातींपासून किंवा गेजवस्त्रापासून विविध प्रकारचे हार आणि अन्य कलात्मक कलाकृती तयार करून दिल्या जात आहेत. ऑर्डरनुसार त्यांची मागणी पूर्ण करून दिली जाते. गेजवस्त्रांच्या हारांना हळदकुंकू, टिकली, जरदोसी वर्क करून आकर्षक बनविल्याने असे हार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.









