कन्नडमध्येच फलक लावण्याची तंबी : मूठभर दुराभिमान्यांची बेळगावात पुन्हा दादागिरी
बेळगाव : काही कन्नड संघटनांची कोल्हेकुई बेळगावमध्ये पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मराठी व इंग्रजी नामफलकांना विरोध दर्शवत व्यापाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न बुधवारी बेळगावच्या मुख्य बाजारपेठेत करण्यात आला. मराठी उद्योजकांना टार्गेट करत कन्नडमध्ये फलक न लावल्यास आपल्या स्टाईलने उत्तर देऊ, असा धमकीवजा इशारा देण्यात आल्याने बेळगावमध्ये पुन्हा एकदा भाषिकवाद उफाळून येण्याची चिन्हे काही विघ्नसंतोषींमुळे दिसू लागली आहेत. बेंगळूरमध्ये कन्नड संघटनांनी इंग्रजी व हिंदी नामफलकांना विरोध करून आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून काही संघटनांचे कार्यकर्ते बुधवारी बेळगावभर मराठी पाट्यांचा शोध घेत फिरत होते. ज्या दुकानांवर मराठी तसेच इंग्रजी फलक दिसतील, अशा दुकानदारांवर दादागिरी करण्यात येत होती. काकतीवेस रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली येथील काही व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांनी केला. यामुळे संतापलेल्या व्यावसायिकांनी जशास तसे उत्तर दिले. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार दुकान, हॉटेल यावर कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषांमध्ये नामफलक लावले आहेत. परंतु, नेहमीच स्टंटबाजी करण्यात हुशार असणाऱ्या काही कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी फलकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बेंगळूरप्रमाणेच बेळगावमध्ये भाषिक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, या प्रकाराला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
व्यापाऱ्यांचे जशास तसे उत्तर…
मराठी व्यापाऱ्यांना वेठीस धरण्यासाठीचा हा एक प्रयत्न होता. गोंधळ घालून व्यापार कमी करणे, हा यामागचा उद्देश होता. परंतु, आम्ही सरकारच्या नियमावलीनुसार फलक लावले असून आम्हाला महानगरपालिका तसेच त्यांचे अधिकारी यांनी कधी नोटिसा पाठविल्या नाहीत. तर तुम्ही दबाव का घालता? ही तुमची दादागिरी बेळगावमध्ये खपवून घेणार नाही, असे सुनावताच त्या कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतला.









