गनेमत सेखाँ व दर्शा राठोड यांचा संभाव्य यादीत समावेश, मैराज खान, मानवजित संधू, श्रेयसी सिंग, शगुन चौधरी यांची संधी हुकली
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
वर्ल्ड कपमध्ये स्कीट प्रकारातील भारताची पहिली पदकविजेती 22 वर्षीय शॉटगन महिला नेमबाज गनेमत सेखाँ तसेच दर्शा राठोड यांची अझरबैजान येथे होणाऱ्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी आणि चीनमधील हांगझोयू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी महिला संघात निवड करण्यात आलेली परिनाझ धालिवाल ही तिसरी नेमबाज आहे. गनेमतने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तसेच वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक मिळविले असून गेल्या महिन्यात अल्माटी, कझाकस्तान येथे झालेल्या वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत तिने रौप्य जिंकत तिसरे पदक मिळविले आहे. दर्शाने अल्माटी येथील स्पर्धेत कांस्य मिळविले होते. त्यामुळे यावेळी वर्ल्ड कपमध्ये वैयक्तिक पदक जिंकणाऱ्या दोन महिला स्कीट नेमबाज भारतीय संघात असतील. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पुरुषांच्या स्कीट संघात अनंतजीत सिंग नरुका, अंगद वीर सिंग बजवा, गुरजोअत सिंग खान्गुरा यांचा समावेश आहे. अनुभवी स्कीट नेमबाज व ऑलिम्पियन मैराज अहमद खान याला मात्र या स्पर्धेसाठी स्थान मिळू शकले नाही. एनआरएआयच्या निकषानुसार, चार चाचणी स्पर्धांमधील गुण व या वर्षातील पूर्वार्धात भाग घेतलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील कामगिरी यांचा विचार करून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात पृथ्वीराज तोंडायमल, झोरावर सिंग संधू, कीनन चिनाय यांना स्थान मिळाले आहे तर 2006 चा वर्ल्ड चॅम्पियन मानवजित सिंग संधूला या संघात स्थान मिळू शकले नाही. त्याची एकंदर कामगिरी पाचव्या क्रमांकाची ठरली. महिलांमध्ये मनीषा कीर, प्रीती रजक, राजेश्वरी कुमारी यांनी या दोन मोठ्या स्पर्धांसाठी स्थान निश्चित केले आहे मात्र श्रेयसी सिंग व शगुन चौधरी यांची संधी हुकली आहे.
अझरबैजानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी नेमबाजी संघ :ट्रॅप-पुरुष-टी. पृथ्वीराज, कीनन चिनाय, झोरावर सिंग संधू. महिला-मनीषा कीर, प्रीती रजक, राजेश्वरी कुमारी. स्कीट-पुरुष-अनंतजीत सिंग नरुका, अंगद वीर सिंग बजवा, गुरजोअत सिंग खन्गुरा. महिला-गनेमत सेखाँ, परिनाझ धालिवाल, दर्शा राठोड. ट्रॅप मिश्र संघ-पृथ्वीराज-मनीषा कीर, कीनन चिनाय-प्रीती रजक. स्कीट मिश्र संघ-अनंतजीत सिंग नरुका-गनेमत सेखाँ, अंगद वीर सिंग बजवा-परिनाझ धालिवाल.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेले नेमबाज : ट्रॅप-पृथ्वीराज, कीनन चिनाय, झोरावर सिंग संधू, मनीषा कीर, प्रीती रजक, राजेश्वरी कुमारी. स्कीट-अनंतजीत सिंग नरुका, अंगद वीर सिंग बजवा, गुरजोअत सिंग खान्गुरा, गनेमत सेखाँ, परिनाझ धालिवाल, दर्शा राठोड. स्कीट मिश्र संघ-अनंतजीत सिंग नरुका-गनेमत सेखाँ, अंगद वीर सिंग बजवा-परिनाझ धालिवाल.









