खलिस्तानी दहशतवाद्याने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ओटावा
कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेला लक्ष्य करत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. कारमधून आलेला हल्लेखोर गोळीबारानंतर तेथून पसार झाला आहे. सुदैवाने या गोळीबारात कुणीच जखमी झालेले नाही. तर आता खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लाडीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबाराच्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक इसम वाहनातून गोळीबार करत असल्याचे दिसून येते. हरजीत सिंह हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या प्रतिबंधित संघटनेचा सदस्य असून तो एनआयएच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत सामील आहे. हरजीत सिंह हा मूळचा पंजाबच्या नवांशहरचा रहिवासी आहे. पंजाबमधील विश्व हिंदू परिषदेचे नेते विकास प्रभाकर उर्फ विकास बग्गा यांच्या हत्येप्रकरणी हरजीत सिंह लाडी, बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख वाधवा सिंह समवेत आणखी 4 जणांच्या विरोधात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.
कॅनडात कपिल शर्माचा कॅफे
कॉमेडियन कपिल शर्माचा कॅफे कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियाच्या सर्रे येथे आहे. येथील कॅफेद्वारे कपिल शर्माने या उद्योगक्षेत्रात पदार्पण केले आहे. परंतु या कॅफेबाहेर गोळीबार झाल्याने कपिल शर्माच्या चिंता वाढणार आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांकडून कपिल शर्माला का लक्ष्य करण्यात आले हे मात्र स्पष्ट झालेले नाही.









