तीन विद्यार्थी जखमी : एकाची प्रकृती गंभीर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील बर्लिंग्टन येथील व्हरमाँट विद्यापीठाजवळ रविवारी तीन पॅलेस्टिनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात तीनही विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. यापूर्वीही अमेरिकेत पॅलेस्टिनींवर हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. आता नव्याने घडलेली ही घटना पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांच्या द्वेषातून घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर आरोपींचा शोध सुरू आहे. दिवसअखेरपर्यंत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.









