मृतांमध्ये मुलांचा समावेश : हल्लेखोर कारवाईत मारला गेला
वृत्तसंस्था/ ऑस्टिन
अमेरिकेतील टेक्सास प्रांताच्या एका मॉलमध्ये शनिवारी गोळीबार घडला आहे. या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुलांचाही समावेश असून 7 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईत गोळीबार करणारा आरोपी मारला गेला आहे.
एलन शहराच्या मॉलमध्ये हा गोळीबार झाला आहे. हल्लेखोराने लोकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला कंठस्नान घातले आहे. तर हल्लेखोरासमवेत 7 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर 2 जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असल्याने तपास केला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी मिसिसिप्पीमध्ये गोळीबाराची घटना घडली होती आणि यात एका किशोरवयीनाला जीव गमवावा लागला होता. तर 6 जण जखमी झाले होते. पोलिसांना हल्लेखोराला पकडण्यास यश आले नव्हते. तर शनिवारी सकाळी कॅलिफोर्नियाच्या चिकोमध्ये एका 17 वर्षीय मुलीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
गन वायलेन्स आर्काइव्हनुसार चालू वर्षात अमेरिकेत आतापर्यंत 198 मास शूटिंगच्या घटना घडल्या आहेत. 30 एप्रिल रोजी टेक्सासमध्ये आणखी एक मास शूटिंग झाली होती. त्यादरम्यान आरोपीने 5 जणांना ठार केले होते आणि यात 9 वर्षीय मुलाचा समावेश होता.
17 एप्रिल रोजी अल्बामा प्रांतातील डेडव्हिलेमध्ये गोळीबारादरम्यान 6 अल्पवयीनांचा मृत्यू झाला होता. तर 20 जण जखमी झाले होते. एका वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान हा गोळीबार झाला होता.









